विमा दावा मंजूर करण्यासाठी केली होती लाचेची मागणी, हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती...
——————–
प्रतिनिधी :
——————–
विमा हिंगोली येथील बांधकाम मजूरांच्या मृत्यूनंतर विमा दावा मंजूर करून देण्यासाठी ५० हजाराची लाच मागून त्यापैकी १० हजाराचा पहिला हप्ता घेणाऱ्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कार्यालयातील कंत्राटी डाटा एन्ट्री आॅपरेटरला मंगळवारी ता. २३ लाच घेतांना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या आई व चुलत मामा यांची बांधकाम कामगार म्हणून काम करीत होते. त्यांची बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कार्यालयात नोंदणी देखील झाली होती. मात्र काही दिवसांपुर्वीच तक्रारदाराच्या आई व चुलत मामा यांचा मृत्यू झाला. त्यांच्या वारसांना कार्यालयाकडून विमा रक्कम दिली जाते. त्यानुसार तक्रारदाराने त्याच्या आईचा २४ हजार रुपये रकमेचा तर मामांचा २.३४ लाख रुपयांचा विमादावा कल्याणकारी मंडळ कार्यालयात दाखल केला होता.
यावेळी त्यांनी तेथील डाटा एन्ट्री ऑपरेटर गोविंद दहीफळे यांच्याशी संपर्क साधला. यावेळी गोविंद याने माझे वरिष्ठांसोबत चांगले संबंध असून तुझे दोन्ही दावे मंजूर करून देतो त्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितली. सदर रकमेपैकी १० हजार रुपयांची रक्कम मंगळवारी ता. २३ तर उर्वरीत रक्कम दावा मंजूर झाल्यानंतर देण्याचे सांगितले.
मात्र तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. यावरून उपाधिक्षक विकास घनवट, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक युनूस शेख, विजय शुक्ला, जमादार भगवान मंडलिक, गजानन पवार, रवींद्र वरणे, विनोद पुंडगे, शिवाजी वाघ, अमोल जाधव, शेख अकबर यांच्या पथकाने आज दुपारी कार्यालयाच्या बाजूला सापळा रचला होता.
दरम्यान, ठरल्या प्रमाणे तक्रारदाराने १० हजार रुपयांची रक्कम आणल्याचे सांगताच गोविंद कार्यालयाच्या बाहेर आला व त्याने १० हजाराची रक्कम स्विकारली. लाचेची रक्कम स्विकारताच पथकाने त्यास रंगेहात पकडले. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
