
तिन जणांवर वसमत शहर पोलिसांत गु्न्हा दाखल…
——————
प्रतिनिधी :
——————
नांदेड येथील एका व्यापाऱ्याला १५ लाखात १ किलो सोने घेण्याचे अमिष चांगलेच महागात पडले असून आरोपींनी चक्क बनावट सोने देऊन फसवणुक केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी वसमत शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. १९ रात्री गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आसेगाव टी पॉईंटवरील सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड येथील शास्त्रीनगर भागातील व्यापारी संतोष बेलापूरे यांच्या दुकानात एक अनोेळखी कुटुंब गेले होते. पुलाच्या खोदकामात सोने सापडले असून सदर सोने खरे आहे किंवा कसे हे तपासण्यासाठी आपली मदत हवी असल्याचे सांगितले. त्यानंतर त्या कुटुंबाने संतोष यांना सोन्याचे मनी दिले. त्यांनी सराफा व्यापाऱ्याकडे जाऊन चौकशी केली असता सदर सोने खरे असल्याचे सांगितले.
त्यांनतर त्या कुटुंबाने १५ लाखात एक किलो सोने देण्याचे संतोष यांना सांगितले. कमी किंमतीत एक किलो सोने मिळत असल्याने संतोष यांनी त्याची कुठेही वाच्यता केली नाही. त्यानंतर संतोष याने सौदा झाल्यानंतर १५ लाख रुपये एकत्र केले. त्यानंतर त्या कुटुंबाने त्यांना वसमत येथील आसेगाव टी पॉईंटवर बोलावून घेतले. त्या ठिकाणी संतोष यांच्याकडून १५ लाख रुपये घेतले व त्यांना एक २० पदरी हार दिला. त्यानंतर ते कुटुुंब निघून गेले.
दरम्यान, काही दिवसानंतर संतोष यांनी सदर सोने गहान ठेवण्यासाठी बँकेत नेले असता त्या सोन्याच्या हाराबाबत त्यांच्या पत्नीला संशय आला. त्यांनी घरी येऊन हार पाण्याने धुतला असता तो काळा पडला. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी भाग्यनगर पोलिस ठाण्यात अर्ज दाखल केला. मात्र सदर घटना वसमत शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्यामुळे त्यांचा अर्ज वसमत शहर पोलिसांकडे वर्ग केला. यावरून पोलिसांनी दोन पुरुषांसह एका महिले विरुध्द गुन्हा नोंदविला आहे. पोलिस निरीक्षक सुधीर वाघ, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बालाजी मिरासे पुढील तपास करीत आहेत.
आसेगाव टी पॉईंटवरील सीसीटीव्हीची तपासणी
आसेगाव टी पाॅईंट येथे सीसीटीव्ही असून् त्याची तपासणी करून त्या फुटेजच्या आधारे त्या दोन पुरुष व एका महिलेची ओळख पटविण्याचे प्रयत्न पोलिसांनी सुरु केले आहे.
