
माळवटा शिवारात महामार्ग ओलांडताना झाला अपघात…
वसमत,ता.६
वसमत ते नांदेड मार्गावर माळवटा शिवारात महामार्ग ओलांडून शेतात जाणाऱ्या महिलेला भरधाव कार ने धडक दिल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी ता ६ दुपारी चार वाजण्याच्या सुमारास माळवटा शिवारातील वसमत- नांदेड महामार्गावर घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील माळवटा शिवारामध्ये लक्ष्मीबाई महादू कदम (६०) यांचे शेत आहे. या शेतातील आखाड्यावर त्या कुटुंबीयांसह राहतात. आज दुपार नंतर त्या वसमत येथे कामासाठी गेल्या होत्या. त्या ठिकाणी काम आटोपून लक्ष्मीबाई परत माळवटा शिवारातील शेताकडे निघाल्या. वसमत येथून माळवटा शिवारात आल्यानंतर महामार्ग ओलांडून शेताकडे जात असताना वसमतकडून नांदेडकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. या अपघातानंतर कारचालकाने कार सोडून पळ काढला. घटनास्थाळी माळवटा येथील गावकरी जमा झाले. त्यांनी तात्काळ ग्रामीण पोलीस ठाण्यात व रुग्णवाहिका चालकास फोन लावला. यावेळी संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी कारच्या काचा फोडल्या.
अपघाताची माहिती मिळताच वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, उपनिरीक्षक मुपडे, जमादार अविनाश राठोड विजय उपरे नामदेव बेंगाळ यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस व गावकऱ्यांनी लक्ष्मीबाई यांना वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मयत लक्ष्मीबाई यांच्या पश्चात एक मुलगा दोन मुली असा परीवार आहे. याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
