
श्रीलंका (कोलंबो) येथे संपन्न होणाऱ्या पाचव्या आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलनात पुरस्काराचे वितरण….
वसमत,ता.९
येथील श्रीयोगानंद स्वामी कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नागनाथ पाटील यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. सदरील पुरस्कार जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळातर्फे देण्यात येत असतो. सदरील पुरस्काराचे वितरण श्रीलंका (कोलंबो) येथे संपन्न होणारे पाचवे आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
यावर्षी जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या वतीने श्रीलंका (कोलंबो ) येथे हे संमेलन दिनांक १७ व १८ मे २०२५ रोजी संपन्न होणार आहे. डॉ नागनाथ पाटील यांच्या वाङ्मयीन क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. प्राचार्य डॉ नागनाथ पाटील हे मराठीतील उत्तम लेखक म्हणून सर्वश्रुत आहेत. वसमत येथील श्री योगानंद स्वामी कला महाविद्यालयामध्ये महाविलयाच्या सुरुवातीपासूनच प्राचार्य पदी कार्यरत आहेत. त्यांच्या नावावर लंबाडी कोंढाण्यातील जीणं, हुतरानी या कादंबऱ्या आहेत. रानभुल मॅपको हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. तसेच ते एक उत्कृष्ट कथाकार असून त्यांचें खोल डोहातील सावल्या ,सावली हरवलेलं झाड हे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी अर्वाचीन मराठी कविता संग्रहाचे संपादन केलेले आहे. आज पर्यंत त्यांना केलेल्या मराठी साहित्य लेखनातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल जवळपास दहापेक्षा अधिक पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत. त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अनेक समित्यावर कार्य करुन शैक्षणिक क्षेत्रात आपली छाप पाडली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाने त्यांना पुरस्कार जाहिर करुन त्यांचा गौरव केला आहे अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष डॉ दीपककुमार खोब्रागडे यांनी दिली. सदरील पुरस्कार मिळाल्याबद्दल जय भवानी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ जयप्रकाश मुंदडा ,सचिव डॉ गोविंद इपकलवार तसेच संस्थेचे सर्व सदस्य महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
