
१.१३ लाख रुपयांच्या कर्जामुळे उचलले टोकाचे पाऊल, नर्सी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद….
वसमत : (साईनाथ पतंगे)
हिंगोली तालुक्यातील सरकळी येथे बँकेच्या १.१३ लाख रुपयांच्या कर्जामुळे शेतकऱ्याने शेतात विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात बुधवारी ता. १४ रात्री अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकळी येथील शेतकरी तुळशीराम सोमोसे (५७) यांना पाच एकर कोरडवाहू शेत आहे. त्यांच्या कुटुंबात पत्नी, एक एक मुलगा असा परिवार असून शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. या शेतावर त्यांनी महाराष्ट्र बँकेकडून १.१३ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. खरीप व रब्बीचा हंगाम चांगला आल्यानंतर कर्ज फेडता येईल अशी त्यांची अपेक्षा होती.
मात्र मागील वर्षी खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे हातचा गेला. सोयाबीन व इतर पिकांचा लागवडीचा खर्चही निघाला नाही. तर रब्बी हंगामातही हिच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे उदरनिर्वाह कसा करावा अन कर्ज कसे फेडावे याची चिंता त्यांना लागली होती. कर्जामुळे मागील काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते. कर्ज कसे फेडावे हे कुटुंबाला बोलून दाखवत होते.
दरम्यान, ता. ८ मे रोजी ते पहाटेच शेतात जातो म्हणून गेले होेते. त्यानंतर त्यांनी शेतातील आखाड्यावर विषारी औषध पिले. मात्र शेतातून घरी येण्यास उशीर होत असल्यामुळे त्यांची पत्नी चंद्रभागाबाई यांनी शेतात जाऊन पाहणी केली असता तुळशीराम हे अत्यावस्थ अवस्थेत पडलेले दिले.त्यांनी तातडीने परिसरातील शेतकऱ्यांना बोलावले. त्यांनतर त्यांना उपचारासाठी हिंगोली येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असतांनाच त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी चंद्रभागाबाई सोमोसे यांनी दिलेल्या माहितीवरून नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक डी. के. दिघाडे पुढील तपास करीत आहेत.
