
वसमत येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई…
—————
वसमत :
—————
लाकडांची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी स्वतःसाठी २० हजार व इतर कर्मचाऱ्यासाठी १० हजार अशी एकूण तीस हजाराची लाच मागणाऱ्या वसमत वनपरिक्षेत्रातील वनपाल बालाजी पवार याच्या विरुध्द वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. १५ रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी वनपाल बालाजी पवार यांना ताब्यातही घेतले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत येथील तक्रारदाराचे फर्निचरचे दुकान आहे. त्यासाठी त्यांना लाकडाची आवश्यकता असते. व्यवसायासाठी लागणाऱ्या लाकडांची वाहतुक करण्यासाठी तसेच ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी वनपाल बालाजी पवार याने त्याच्यासाठी २० हजार तर वनरक्षकासाठी १० हजार रुपये असे ३० हजार रुपयांची मागणी केली.
या प्रकरणात संबंधित तक्रारदाराने हिंगोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. या तक्रारीची लाचलुचपतकडून पडताळणी देखील करण्यात आली. या पडताळणीमध्ये वनरक्षक पवार याने लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर लाचलुचपतचे उपाधिक्षक विकास घनवट, जमादार ज्ञानेश्वर पंचलिंगे, तान्हाजी मुंडे, राजाराम फुफाटे, भगवान मंडलिक, गजानन पवार, शेख अकबर यांच्या पथकाने वसमत येथे सापळा रचला होता.
मात्र वनरक्षक पवार याला संशय आल्याने त्याने लाचेची रक्कम स्विकारली नाही. त्यानंतर या प्रकरणात वनरक्षक पवार याने लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्याने त्याच्या विरुध्द वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात लाच मागितल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने वनपाल बालाजी पवार यांना ताब्यात घेतले आहे. पोलिस उपाधिक्षक विकास घनवट पुढील तपास करीत आहेत.
