
वाळू ऐवजी डस्ट तर मुरम ऐवजी मातीचा वापर…
फालतू निकृष्ट दर्जाचे बांधकाम बंद कर, आमदार नवघरे यांनी मोबाईलवर गुत्तेदारास झापले….
————–
वसमत
————–
पुढील ४० वर्ष प्रवाशांना सेवा देणाऱ्या वसमतच्या नुतन बसस्थानकाच्या बांधकामाला निकृष्ट दर्जाची लागलेली साडेसाती काही थांबता थांबेना. वाळू, मुरुमापासून ते दर्जाहिन बांधकाम साहित्य वापरुन गुत्तेदार आपले उखळ पांढरे करुन घेत आहे. राजकीय पक्षांसह सामाजिक कार्यकर्ते यांनी आंदोलने व तक्रारी करुनही बांधकामाचा दर्जा सुधारला जात नाही हे विशेष. दरम्यान सोमवारी आमदार राजू नवघरे यांनी इलेक्ट्रीक बसच्या उद्घाटन निमित्ताने बसस्थानकात आले असता बसस्थानक इमारत बांधकामास भेट दिली. या वेळी केवळ दोन दिवसांपूर्वी तळभगावर टाकलेल्या सिमेंट काँक्रेटच्या बेडला तडे गेलेले निदर्शनास आले. या वेळी आमदार नवघरे यांनी संबंधीत गुत्तेदारास जाब विचारुन फालतू व निकृष्ट दर्जाचे बांधकाम बंद कर असे सांगितले.
नुतन बसस्थानकाच्या बांधकामास निधी मंजूर झाल्यानंतर तब्बल सहा वर्षांनंतर प्रत्यक्ष बांधकामांचे योग जुळून आले. प्रवाशी व कर्मचारी यांना सेवा देणारे बसस्थानक उभारले जात असल्याने सर्व स्तरातील नागरीकांमधून समाधान व्यक्त केले जात होते. मात्र या बांधकामाला पाया (फुटींग) पासून निकृष्ठतेची घरघर लागली. याबाबत शिवसेना सहसंपर्कप्रमुख सुनिल काळे यांनी एसटी महामंडळाच्या विभागीय अधिकारी यांची भेट घेऊन तक्रार केली. तसेच राज्यातील नुतन इमारतीचे बांधकाम पाहणारे अभियंता यांच्याकडे तक्रार करुन बोगस काम बंद करण्याची मागणी केली होती. त्याबरोबरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अनेकदा आंदोलने करीत प्रशासनाला जागे करण्याचे काम केले. मात्र वरीष्ठ अधिकारी ते राजकीय मंडळी सांभाळण्यात प्राविण्य असलेले संबंधित गुत्तेदारावर कोणताच परीणाम झाला नाही. दरम्यान इमारतीच्या तळभागावर सिमेंट काँक्रेटचा बेड टाकण्यात आला. मुरुम आणि लोखंडी सळईचा वापर नसल्याने त्यावर दोन दिवसातच तडे गेले. ज्या इमारतीचा पाया पक्का नसेल तर त्या इमारतीचे भविष्य काय राहिल असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. सोमवारी आमदार राजू नवघरे यांनी इ-बसच्या उद्घाटनाच्या निमित्ताने बसस्थानक बांधकामास भेट दिली असता निकृष्ट बांधकाम त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांनी सुरु असलेले निकृष्ट बांधकाम थांबवले. आता प्रत्यक्ष आमदार राजु नवघरे यांनी बसस्थानक बांधकामात लक्ष घातले असल्याने आता येथून पुढे बांधकामाचा दर्जा सुधारेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
