
वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
*********
वसमत :
*********
वसमत ते परभणी मार्गावर थोरावा पाटीजवळ भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला असून या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात बुधवारी ता. २८ रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी कंटेनर ताब्यात घेतला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परभणी जिल्हयातील फुलकळस येथील भिमाशंकर उर्फ समाधान कनकटे (२२) हा त्याचा मित्र सोनु साबळे याच्या सोबत दुचाकी वाहनावर त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी नांदेड येथे गेले होते. त्या ठिकाणी मुक्काम करून ते दोघेही दुचाकीने मंगळवारी ता. २७ सकाळीच वसमत मार्गे परभणीकडे निघाले होते.
वसमत ते परभणी मार्गावर थोरावा पाटीजवळ त्यांच्या दुचाकीला भरधाव ट्रकने (एमएच-१६-सीडी-९४३३) त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात भिमाशंकर व सोनु दोघेही गंभीर जखमी झाले तर दुचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले. या अपघाताची माहिती मिळताच वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, जमादार रामा लोखंडे, आंबादास विभुते, विजयकुमार उपरे, विनायक जानकर, अरविंद राठोड यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी दोघांनाही उपचारासाठी वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र भिमाशंकर याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी जाहिर केले. तर गंभीर जखमी झालेल्या सोनु याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे पाठविले. मात्र त्याची प्रकृती अधिकच गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, या अपघातानंतर पोलिसांनी ट्रक व चालकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गौतम कनकटे यांच्या तक्रारीवरून ट्रक चालका विरुध्द वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात बुधवारी ता. २८ रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक बोराटे पुढील तपास करीत आहेत.
