
इ साला कप नामदे…! आरसीबीचं जेतेपदाचं स्वप्न पूर्ण झाल्यानंतर विराट कोहलीला अश्रू अनावर
प्रतिनिधी :-
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने अखेर 17 वर्षांची प्रतिक्षा संपवत इतिहास घडवला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीम आयपीएलच्या 18 व्या मोसामतील चॅम्पियन ठरली आहे. आरसीबीने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अंतिम सामन्यात पंजाब किंग्सवर 6 धावांनी मात करत आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. आरसीबीच्या या विजयासह विराट कोहली याचं ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्नही पूर्ण झालं आहे. आरसीबीने पंजाबसमोर 191 धावाचं टार्गेट ठेवलं होतं. मात्र आरसीबीच्या गोलंदाजांसमोर पंजाबला 7 विकेट्स गमावून 184 धावा करता आल्या. आरसीबीने अशाप्रकारे चौथ्या प्रयत्नात फायनलमध्ये विजय मिळवला. आरसीबीच्या विजयानंतर विराट भावूक झाला. विराटला भावना अनावर झाल्या. तर दुसऱ्या बाजूला पंजाबची आयपीएल फायनलमध्ये पराभूत होण्याची 2014 नंतरची ही पहिली तर एकूण दुसरी वेळ ठरली.
पंजाबची विजयी धावांचा पाठलाग करताना आश्वासक सुरुवात झाली. प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंह या सलामी जोडीने 43 धावांची भागीदारी केली. त्यानंतर प्रियांश आर्या 24 धावा करुन आऊट झाला. त्यानंतर प्रभसिमरन सिंह याने 26 करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. आरसीबीने पंजाबला ठराविक अंतराने झटके देत शेवटपर्यंत सामन्यावरील पकड कायम ठेवली आणि विजयावर शिक्कामोर्तब केला. पंजाबसाठी शशांक सिंह याने पंजाबला जिंकवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. मात्र त्यात त्याला यश आलं नाही. शशांकने पंजाबसाठी सर्वाधिक धावा केल्या. शशांकाने 30 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 3 फोरसह नाबाद 61 धावा केल्या. तर इतरांनीही योगदान दिलं. मात्र त्यांचं हे योगदान आरसीबीला चॅम्पियन होण्यापासून रोखू शकलं नाही.
पंजाबसाठी शशांक व्यतिरिक्त जोश इंग्लिसने 39 धावा केल्या. तर नेहल वढेरा याने 15 धावांचं योगदान दिलं. या व्यतिरिक्त पंजाबकडून एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. आरसीबीसाठी भुवनेश्वर कुमार आणि कृणाल पंड्या या दोघांनी बॉलिंगने निर्णायक भूमिका बजावली. दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. रोमरियो शेफर्ड याने एकमेव मात्र श्रेयस अय्यरची सर्वात मोठी विकेट मिळवली. त्याव्यतिरिक्त यश दयाल आणि जोश हेझलवूड या दोघांनीही प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
