
वसमत तालुक्यातील कोनाथा येथील घटना, हट्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…
—————
प्रतिनिधी :
—————
वसमत तालुक्यातील कोनाथा येथे पालखी सोहळ्या सोबत पायी गेलेल्या भाविकाचे घर फोडून चोरट्यांनी ५.५० लाख रुपयांचा एेवज पळविल्याची घटना घडली असून या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. १९ सायंकाळी गुन्हा दाखल झाला आहे. पाेलिसांनी दोन संशयीतांची चौकशी सुरु केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील कोनाथा येथील ओमकार बेंडे हे त्यांच्या कुटुंबियांसह कोनाथा शिवारातील एका मंदिरात अन्नदानाच्या कार्यक्रमासाठी बुधवारी ता. १८ सकाळी दहा वाजता गेले होते. यावेळी त्यांनी घराला कुलुप लावले होते. त्या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम झाल्यानंतर कोनाथा ते एरंडेश्वर पायी पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते.
दरम्यान, घराला कुलुप असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलुप तोडून आता प्रवेश केला. घरातील एका रुमचे कुलुप तोडून घरात जाऊन त्या ठिकाणी असलेल्या लोखंडी कपाटाचे कुलुप तोडले. त्यानंतर कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त टाकून कपाटातील १८ तोळ्याचे दागिने पळविले. यामध्ये पाच तोळे वजनाचे सोन्याचे नेकलेस, पाच तोळे वजनाचा सोन्याचा पोहेहार, पाच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, दोन तोळे वजनाचे कानातील सोन्याचे वेल, अंदाजे दिड तोळे वजनाच्या सोन्याच्या तीन अंगठ्याचा समावेश आहे.
दरम्यान, रात्री आठ वाजता बेंडे कुटुंबिय घरी आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने हट्टा पोलिसांना माहिती दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव, उपनिरीक्षक युवराज गवळी, जमादार आसेफ यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले. मात्र श्वान पथक घटनास्थळापासून काही अंतरावरच जाऊन घुटमळले. श्वान पथकाला चोरट्यांचा माग काढता आला नाही.
या प्रकरणी ओमकार बेंडे यांनी आज सायंकाळी हट्टा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोन संशयीतांची चौकशी सुरु केली असल्याचे सुत्रांनी सांगितले.
