
पुर्णा पाटबंधारे विभागाच्या पाणी वापर आणि बचतीच्या नियोजनाचा परिणाम , यंदा दोन्ही धरणं १०० टक्के भरण्याची शक्यता…
—————–
प्रतिनिधी :
—————–
हिंगोली, परभणी व नांदेड जिल्ह्यातील सिंचन व पिण्याच्या पाण्याचे नियोजन असलेल्या पुर्णा पाटबंधारे विभागाचा येलदरी धरणात पावसाळा हंगाम सुरू होऊन केवळ तीन आठवडेच पुर्ण होत असतानाच ४९.८८ टक्के पाणी साठा आहे. तर सिध्देश्वर धरणात १९.८६ टक्के एवढा पाणीसाठा आहे. पुर्णा पाटबंधारे विभागाने २०२४-२५ मध्ये पाणी वापर व पाणी बचतीचे योग्य नियोजन केल्याचा हा परिणाम आहे.
पुर्णा पाटबंधारे प्रकल्पाचे हिंगोली, परभणी व नांदेड जिल्ह्यात ५७९८८ हेक्टर कार्यक्षेत्र असून यामध्ये हिंगोली जिल्ह्यात २२६५८ हेक्टर, परभणी जिल्ह्यात १६१४२ हेक्टर तर नांदेड जिल्ह्यात १९१८८ हेक्टर लाभक्षेत्र आहे. या एकुण लाभक्षेत्राला रब्बी व उन्हाळी हंगामाच्या सिंचनासह पिण्याच्या पाण्याचे नियोजन असते. २०२४ -२५ हंगामात पुर्णा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष बिराजदार यांनी पाणी वापर व पाणी बचतीचे योग्य नियोजन केले. रब्बी हंगामासाठी ४ पाणी पाळी तर उन्हाळी हंगामासाठी ४ अशा ८ पाणी पाळी देऊन सिंचन केल्यानंतर धरणात ४५ टक्के पाणीसाठा बचत केला होता. परिणामी अद्याप धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस नसतानाही धरणात ५० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तर सिध्देश्वर धरणात २० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. सद्यस्थितीत येलदरी धरणात ४०३.९३२ दलघमी उपयुक्त जिवंत पाणी साठा आहे. तो मागील वर्षी २१९.८३४ दलघमी एवढा होता. मागच्या वर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पट पाणीसाठा आहे. तर सिध्देश्वर धरणात १६.०८३ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. तो मागच्या वर्षी आजघडीला शुन्य होता. ७ जून रोजी मृग नक्षत्रापासून पावसाळी हंगामास सुरुवात झाली आहे. पावसाला सुरुवात झाली असली तरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप पाऊस झाला नाही. हवामान खात्याने वर्तवल्यानुसार पाऊस झाल्यास सप्टेंबर महिन्यातच येलदरी व सिध्देश्वर धरण पुर्ण क्षमतेने भरु शकते अशी माहिती पाटबंधारे विभागाकडून मिळते. २०२५-२६ हंगामात प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात पुर्ण क्षमतेने सिंचनासाठी पाणी मिळू शकणार आहे.
