
वसमतला शक्तिपीठ महामार्ग बाधीत शेतकर्यांचा रास्तारोको …
——————
प्रतिनिधी :
शक्तिपीठ महामार्ग हा आमचा घर आणि संसार उद्धवस्त करणारा महामार्ग असल्याची संतप्त प्रतिक्रिया देत सदरील महामार्ग रद्द करावा अशी आक्रमक मागणी करीत मंगळवार ता.१ वसमत तालुक्यातील शक्तिपीठ महामार्ग बाधीत १४ गावातील शेतकऱ्यांनी वसमत-परभणी महामार्गावर रास्तारोको आंदोलन केरीत शासनाला मागण्यांचे निवेदन दिले.
नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाला राज्य सरकारने नुकतीच मंजुरी दिली आहे. सदरील महामार्गाला शेतकर्यांचा विरोध असताना त्यास मंजुरी दिली गेली असल्याने बाधीत शेतकरी संतप्त झाले आहेत. वसमत तालुक्यातील १४ गावांमधून हा शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे. वसमत तालुक्यातील शेतीला येलदरी, सिध्देश्वर व इसापूर धरणाचे पाणी असल्याने पुर्णपणे सि़चनाखाली येते. सदरील प्रकल्प शासनाचा व्यावसायिक प्रकल्प असून यामुळे खेडेगावातील शेतकऱ्यांना कोणताच फायदा होणार नाही. उलट सुपिक जमीनी प्रकल्पात जात असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद आहे.
शक्तिपीठ महामार्ग म्हणजे शेती, शेतकरी व पर्यावरण उध्दवस्त करणारा प्रकल्प असल्याने तो रद्द करावा अशी मागणी होत आहे. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी शेतकरयांना महामार्ग रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र शेतकर्यांना बेसावध ठेवून त्यास मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली गेल्याचे शेतकरी अधिकच आक्रमक झाले असून महामार्गाची प्रक्रिया सुरु ठेवल्यास शेतकर्यांचा उद्रेक होणार असून शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीने आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार केला आहे.
शेतकर्यांच्या भावनेची शासनाने दखल घ्यावी. यापुर्वीही शासनाला निवेदने देऊन मागण्या कळवल्या आहेत. मात्र याबाबत शासनाने शेतकऱ्यांसोबत कोणताही संवाद साधला नसल्याचे सांगून मागणी पुर्ण न झाल्यास लोकशाही मार्गाने साखळी उपोषण करणार असून अधिकारी जमीन मोजणीस आल्यास शेतकरी सामुहिक आत्महत्या करतील. त्याची जबाबदारी शासनाची राहिल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. या वेळी वसमत तालुक्यातील १४ गावातील शक्तिपीठ महामार्ग बाधीत शेतकरी उपस्थित होते. या वेळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधिर वाघ यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
