
गुंजच्या शेतकऱ्यांचा प्रशासनाला निर्वाणीचा इशारा, मोजणीही बंद पाडली…
——————-
प्रतिनिधी :
——————-
शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन हवी असेल तर आमच्या बळी घ्यावा लागेल मगच जमीन मिळेल असा निर्वाणीचा इशारा देत गुंज येथील शेतकऱ्यांनी मंगळवारी ता. ८ मोजणीचे काम करण्यासाठी आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना रोखले. त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले.
नागपूर ते गोवा हा शक्तिपीठ महामार्ग हिंगोली जिल्हयातून जात आहे. या महामार्गासाठी कळमनुरी व वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमीनी संपादीत कराव्या लागणार आहेत. मात्र शेेतकऱ्यांनी या महामार्गासाठी जमीनी देण्यास विरोध दर्शविला आहे.या भागात बहुतांश शेतकऱ्यांच्या शेत जमीनी बागायती असून जमीनी संपादीत केल्यास सर्व शेतकरी भुमीहिन होण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या भागात शेतकऱ्यांनी जमीन देण्यास विरोध केला आहे.
दरम्यान, आज वसमत तालुक्यातील गुंज तर्फे आसेगाव येथे प्रशासनाकडून मोजणीचे काम हाती घेतले जाणार होते. त्यासाठी अधिकारी शेतात गेले होते. मात्र त्या ठिकाणी अमोल मुळे, विश्वनाथ नरवाडे, शिवहार नरवाडे, गणपत नरवाडे, सदाशिव नरवाडे, हनुमान नरवाडे, सखाराम नरवाडे, मीनाबाई नरवाडे, खंडू नरवाडे, नागनाथ नरवाडे यांच्यासह शेतकऱ्यांनी तेथे येऊन मोजणीसाठी विरोध दर्शविला. आमचा या महामार्गासाठी विरोध असून आम्ही जमीनी देणार नाही अशी भुमीका शेतकऱ्यांनी घेतली. त्यानंतर शेतकऱ्यांनी रस्त्यावरच ठाण मांडले.
दरम्यान, उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. मात्र शेतकऱ्यांनी आमचा विरोध असल्याची भुमीका कायम ठेवली. त्यानंतर निवेदन सादर केले असून या महामार्गासाठी जमीन हवी असल्यास आमचा बळी घ्यावा लागेल असा निर्वाणीचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. तर शेतजमीन जबरदस्तीने घेतल्यास सामुहिक आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेऊन मोजणीचे काम थांबविण्यात आले.
