
ईश्वर प्राप्तीचा मार्ग दाखविण्यासाठी गुरुची आवश्यकता – गुरुवर्य करबसव शिवाचार्य महाराज
मानवी जीवनात परोपकार शिकला पाहिजे – गुरुवर्य डिगांबर शिवाचार्य महाराज
वसमत :
येथील लासिन मठ संस्थान व थोरला मठ संस्थान येथे गुरुवार ता.१० गुरु पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गुरुवर्य करबसव शिवाचार्य महाराज व डिगांबर शिवाचार्य महाराज यांचे पुजन करुन दर्शन करण्यासाठी मराठवाड्यातून हजारो वीरशैव लिंगायत शिष्यगण वसमत येथे आले होते.
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी वसमत येथील लासिन मठ व थोरला मठात गुरु पौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासून दोन्ही मठ संस्थांनमध्ये भजनी मंडळाच्या वतीने भजन, गुरु नामस्मरण कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. सकाळी १० वाजल्यापासून शिष्य मंडळी यायला सुरुवात झाली. विशेष म्हणजे महिला शिष्यगण मोठ्या संखेने उपस्थित होते. तसेच वसमत शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गुरुंचे दर्शन घेऊन पुष्पहार अर्पण केला. गुरुपुजन व आरती नंतर गुरुंनी उपस्थित शिष्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी लासिन मठाचे अधिपती गुरुवर्य करबसव शिवाचार्य महाराज यांनी मानवी जीवनात गुरुंचे महत्व सांगताना मानसाला ईश्वराची ओळख करुन देण्यासाठी, आचरणात आणण्यासाठी गुरुची आवश्यकता असल्याचे सांगून गुरुंना कधी बाबाजी, पादरी, महाराज, मौलवी , साधू अशी नावे दिली गेली या सर्व रुपात गुरुंनी मानवतेच्या कल्याणासाठी काम केले असून विश्वात गुरुंचे स्थान श्रेष्ठ असल्याचे सांगितले.
तर थोरला मठाचे मठाधिपती वेदांतचार्य डिगांबर शिवाचार्य महाराज यांनी उपस्थित शिष्यगणांना मार्गदर्शन करताना मानवी जीवनात परोपकाराचे महत्त्व सांगताना दिन-दुबळे. गोर-गरीब, अज्ञानी अशांना वाट दाखविण्याचे मौलिक काम जो करतो खर्या अर्थाने मानवी जीवनात ती गुरु पौर्णिमा असल्याचे सांगितले.
गुरुवर्यांच्या आशिर्वचनानंतर दोन्ही मठ संस्थांन येथे महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी हजारो शिष्यगण व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वीरशैव लिंगायत समाज बांधवांनी पुढाकार घेतला.
