
जखमींना उपचारासाठी गुलबर्गा येथे हलविले
——————-
प्रतिनिधी :
——————
गाणगापूर (कर्नाटक) येथे सीटीबस अन ॲटोची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात वसमतच्या दोन महिला भाविकांचा मृत्यू झाला असून एक महिला भाविक गंभीर जखमी झाली आहे. बुधवारी ता. ९ रात्री साडेनऊ ते दहा वाजण्याच्य्ा सुमारास हा अपघात घडल्याचे गाणगापूर पोलिसांनी सांगितले. जखमी महिलेस उपचासाठी गुलबर्गा येथील रुग्णालयात हलविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील चार ते पाच महिला भाविक भाविक गुरुपौर्णिमेनिमित्त दर्शनासाठी गाणगापूर येथे गेल्या होत्या. वसमत येथून निघालेल्या महिला बुधवारी सकाळी अक्कलकोट येथेे पोहोचल्या. त्यानंतर रात्रीच्या सुमारास त्या गाणगापूर येथे दर्शनासाठी निघाल्या. गाणगापूर येथे बसने पोहोचल्यानंतर त्या ॲटोने दर्शनासाठी मंदिराकडे निघाल्या होत्या. यावेळी सीसीबस व ॲटोची समोरा समोर धडक झाली. या अपघातात ॲटोमधील महिला भाविक गंभीर जखमी झाल्या.
या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर गाणगापूर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक पी. राहूुल यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी गाणगापूर येथील शासकिय रुग्णालयात हलविले. मात्र वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर रुख्मीनीबाई विठ्ठल ढोरे (४५, रा. बाभूळगाव), कुसुमताई विठ्ठल जाधव (५५, रा. वसमत) यांचा मृत्यू झाल्याचे जाहिर केले.
या अपघातात गंभीर जखमी झाले्लया लक्ष्मीबाई ढोरे (रा. बाभुळगाव) यांच्या हाताला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना पुढील उपचारसाठी गुलबर्गा येथील रुग्णालयात हलविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या नातेेवाईकांनी आज पहाटेच गाणगापूरकडे धाव घेतली आहे. मयत रुख्मीबाई यांच्या पश्चात पती, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. तर मयत कुसुमबाई यांच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. या घटनेमुळे वसमत तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
