
जयंत पाटील यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा , नविन प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा…
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा सोपवल्याचे समजते. नव्या प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीसाठी शरद पवार यांनी मंगळवारी पक्षातील नेत्यांची बैठक बोलावली असून या बैठकीत जयंत पाटील यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाण्याची शक्यता आहे.
जयंत पाटील हे आधी एकसंध राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगळी वाट निवडल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली आणि त्यानंतर उदयास आलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यपदाची धुराही शरद पवार यांनी जयंत पाटील यांच्या खांद्यावरच देणे पसंत केले. जयंत पाटील हे शरद पवार यांचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे निष्ठावंत सहकारी आहेत. मात्र पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून सलग दोन टर्म पूर्ण केल्याने आता नव्या चेहऱ्याला संधी मिळावी, अशी मागणी पक्षातील विविध नेत्यांकडून केली जात आहे.
मागील वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर अहिल्यानगर येथील विजयी मेळाव्यातही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मंचावर आमदार रोहित पवार यांनी अप्रत्यक्षपणे ही मागणी केली होती. त्यानंतर विधानसभा निवडणूक होईपर्यंत माझ्या पदाचे दिवस मोजत बसू नका, त्यानंतर मी स्वत:च या जबाबदारीतून मुक्त होईल, असं जयंत पाटलांनी सांगितलं होतं. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होईपर्यंत त्यांनाच पदावर कायम ठेवलं जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु या निवडणुकांआधीच प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय पाटील यांनी घेतल्याचं दिसत आहे.
दरम्यान, जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याविषयी अद्याप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मंगळवारी होणाऱ्या बैठकीवेळीच याबाबतची स्पष्टता येण्याची शक्यता आहे.
