
श्री योगानंद स्वामी महाविद्यालयात विद्यार्थी – पालक मेळावा संपन्न….
——————-
प्रतिनिधी :
——————-
विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिरेक टाळून पुस्तकाच्या जगात प्रवेश करावा. वाचनाने माणसाचे आयुष्य समृद्ध होते. संवादातून समाजाची प्रगती होत असते. परंतु, दुर्दैवाने माणसामाणसांतील संवाद नाहीसा होत आहे. विद्यार्थ्यांनी संवादी राहून आपल्या अवतीभोवतीचा समाज समजून घेतला पाहिजे, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक, समीक्षक प्रा. डॉ. यशपाल भिंगे यांनी केले. ते श्री योगानंद स्वामी महाविद्यालय, वसमत आयोजित माजी विद्यार्थी व पालक मिळाव्यात बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सहकारमंत्री तथा संस्थाध्यक्ष डॉ .जयप्रकाश मुंदडा हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून वसमतच्या तहसिलदार सौ.शारदाताई दळवी, संस्थेचे सहसचिव श्री. राजेश मंचेवार, प्राचार्य डॉ .नागनाथ पाटील आदींची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना डॉ.भिंगे म्हणाले की, माणसातील संवेदना नष्ट होत आहे.त्यामुळे माणूस जाणीविने समृद्ध झाला पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपल्या गावाचा इतिहास समजून घ्यावा. आपल्या परिसरातील थोर, कर्तबगार माणसांच्या चरित्राचे वाचन करावे. त्यातून काळाची आव्हाने समर्थपणे पेलण्याची प्रेरणा मिळते. समाज केवळ बोलण्याने नव्हे तर कृतीने बदलत असतो. विद्यार्थ्यांनी कष्ट, परिश्रमावर विश्वास ठेवून सकारात्मकतेने जीवनाची वाट
चाल करावी, यश हमखास मिळते,असे त्यांनी शेवटी सांगितले.
तहसिलदार शारदा दळवी म्हणाल्या की, विद्यार्थी व पालक मेळावा अशा कार्यक्रमातील विचारातून विद्यार्थ्यांमध्ये परिवर्तन घडून येते. तरुणांनी महाविद्यालयीन जीवनाकडे गांभीर्याने पाहावे. कारण हा काळ अत्यंत महत्त्वाचा व जीवनाला आकार देणारा असतो. विद्यार्थ्यांनी चांगले संस्कार आत्मसात करून आपले भविष्य उज्ज्वल करावे. डॉ. जयप्रकाश मुंदडा मार्गदर्शन करताना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचे कष्ट विसरु नये. उच्च स्वप्न पाहून व ध्येयवादी होऊन प्रयत्न केल्यास यश हमखास मिळते. विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान घेण्याची तळमळ असावी लागते. त्यासाठी अनेक ग्रंथांचे वाचन करावे. तसेच पालकांनी आपल्या मुलाकडे लक्ष दिले पाहिजे. जागरूक पालक आपल्या पाल्याच्या भविष्याला दिशा देतो. अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडत असते, असे प्रतिपादन डॉ.मुंदडा यांनी केले. यावेळी बी.ए. प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन मान्यवरांचे हस्ते स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.नागनाथ पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. बाळासाहेब भिंगोले यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.शशिकांत तोळमारे यांनी केले. तर आभार डॉ.काशीनाथ चव्हाण यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. संदीप गोरे, डॉ, गजानन सारंग, डॉ.मीनाक्षी बोरीवाले यांसह सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांनी पुढाकार घेतले. कार्यक्रमास विद्यार्थी , विद्यार्थिनी, माजी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
