
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उध्दव ठाकरेवर नाव न घेता सडकून टिका, हिंगोलीच्या कावड यात्रेत लाखो शिवभक्तांचा सहभाग
——————-
प्रतिनिधी :
——————
काही लोक कार्यकर्त्यांना कस्पटा सारखे वागवितात, घरगडी समजतात त्यांना जनतेने जागा दाखवून दिली, मातांसाठी आता किती लाचारी पत्करणार अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी ता. ४ हिंगोली येथे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर सडकून टिका केली. तसेच लाखो शिवभक्तांना कावड यात्रेच्या माध्यमातून एकत्र करणारा आमदार संतोष बांगर हा शिवसेनेचा ढाण्या वाघ असल्याने गौरवोद्गार त्यांनी काढले.
हिंगोली येथे शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या कावड यात्रेच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार संतोष बांगर, बाबुराव कोहळीकर, हेमंत पाटील, माजी खासदार सुभाष वानखेडे, ॲड. मनिष साकळे, माजी सभापती श्रीराम बांगर, राम कदम, गुड्डू बांगर, सुभाष बांगर, संजय बोंढारे, राजेंद्र शिखरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आमदार बांगर यांनी यापुर्वी काही जणांना कावड यात्रेसाठी बोलावले होेत. मात्र ते कावड यात्रेसाठी आले नाहीत. मात्र ज्यांनाच कावडीत बसायचे होते ते कावड यात्रेला कसे येणार, ते दुसरीकडे थंड हवेच्या ठिकाणी फिरतात अशी टीकाही त्यांनी उध्दव ठाकरे यांचे नांव न घेता केली. कावड यात्रेतील हिंदुत्वाचा जागर पहायला मोठे मन लागले असे त्यांनी सांगितले.
राज्यातील काही जण कार्यर्त्यांना घरगडी म्हणून वागवितात, मात्र आम्ही स्वतःलाच कार्यकर्ता समजून काम करत असून सर्व सामान्यांच्या सोबत राहून विकास कामे करणार आहे. सर्व सामान्य माणूसच आमचा केंद्रबिंदू असून त्यांच्यासाठीच जगायचे अन विकास करायचा असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राज्यात आमची दुसरी इनिंग सुरु असून राज्याला पुढे नेण्याचे काम करायचे आहे. आम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलो नसलो तरी जनतेला सर्व समान्यांना सोन्याचे दिवस आणण्याचे प्रयत्न करणार असून हाच आमचा अजेंडा आहे. आमचा जाहिरनामा म्हणजे चुनावी जुमला असल्याचा आरोप करण्यात आला. मात्र लाडकी बहिण योजना बंद होणारच नाही शिवाय जाहिरनाम्यातील सर्व योजना टप्प्याटप्याने पूर्ण करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
काँग्रेसच्या काळात झालेल्या बाँम्बस्फोटाच्या वेळी काँग्रेसची मंडळी दहशतवादाला धर्म नसतो असे सांगत होते, मात्र मालेगाव स्फोटाला भगवा दहशतवाद म्हटले. मतांसाठी व्होट बँक वाचविण्यासाठी किती लाचारी करणार असा सवात त्यांनी केला. ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले तरी सैन्याच्या कामगिरीवर शंका घेणारे हे कुठले देशभक्त आहेत. व्होट बँकेचे राजकारण करतांना भगवा दहशतवाद म्हणणाऱ्या हिंदू द्वेषींना जनता त्यांची जागा दाखविल्या शिवाय राहणार नाही असा दावा त्यांनी केला. हिंदूत्वाला बदनाम करणाऱ्यांना जनता माफ करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीत देश जिंकला, विधानसभा निवडणुकीत राज्य जिंकले आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकजूटीने जिंकायच्या असल्याचे त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी, कळमनुरी येथील चिंचाळेश्वर महादेव मंदिर येथे आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते दुपारी महापूजा झाल्यानंतर कावड यात्रा हिंगोली कडे निघाली. या कावड यात्रेमध्ये हजारो भाविक सहभागी झाले होते तसेच भाविकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी चहापाणी व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती.
श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी आमदार संतोष बांगर यांच्यावतीने कळमनुरी येथील चिंचाळेश्वर महादेव मंदिर ते हिंगोली येथील कयाधू अमृतधारा महादेव मंदिर या 18 किलोमीटर अंतराची कावड यात्रा काढली जाते.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी कावडयात्रा काढण्यात आली. हिंगोली जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यातील भाविक आज सकाळपासूनच कळमनुरी येथील चिंचाळेश्वर महादेव मंदिराजवळ एकत्र आले होते. दुपारी आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. यावेळी आमदार राजेश नवघरे, ॲड. मनीष साकळे, माजी सभापती श्रीराम बांगर, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख राम कदम, गुड्डू बांगर, संजय बोंढारे, राजेंद्र शिखरे,ॲड. सुरेश गडदे, सुभाष बांगर, संतोष वेरुळकर, दिनकर गंगावणे, सुधाकर गंगावणे यांच्यासह हजारो भाविक, कार्यकर्ते उपस्थित होते.
कळमनुरी येथे महापूजा झाल्यानंतर कावड यात्रा हिंगोली कडे निघाली. हर हर महादेव, बम बम बोले च्या गजरामध्ये कावड यात्रा निघाली. कावड यात्रेत सहभागी झालेल्या हजारो भाविकांच्या गर्दीमुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. पोलीस प्रशासनाने वाहतूक व्यवस्थेत बदल केला.
दरम्यान कावड यात्रेतील भाविकांना सिमेंट रस्त्याचा त्रास होऊ नये यासाठी स्प्रिंकलर द्वारे रस्त्यावर पाणी सोडण्यात आले होते. याशिवाय शिवनी, उमरा फाटा, खानापूर, हिंगोली बायपास या ठिकाणी भाविकांच्या नाश्ता भोजन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. भाविकांच्या व्यवस्थेसाठी हजारो हात सकाळपासूनच कामाला लागले होते.
दरम्यान मागील वर्षीपेक्षा यावर्षी कावड यात्रेमधील सहभागी भाविकांची गर्दी वाढली होती. तसेच कावड यात्रेत भाविकांचा मोठा उत्साह दिसून आला.
