
अंगणवाडी मदतीनीसपदी निवड केल्याबद्दल लाचेची स्विकारली रक्कम
———————-
प्रतिनिधी :
———————-
हिंगोली शहरात अंगणवाडी मदतनीसपदावर निवड केल्या बद्दल २५ हजार रुपयांची लाच घेतांना बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी ता. ६ दुपारी रंगेहात पकडले. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
याबाबत लाचलुचपतच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील नागरी बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयांतर्गत तक्रारदाराच्या पत्नीची अंगणवाडी मदतनीस म्हणून निवड करण्यात आली होती. या निवडीबद्दल मोबदला म्हणून बालविकास प्रकल्प अधिकारी विशालसिंह चव्हाण (३८) याने ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानुसार तक्रारदाराने पहिल्या टप्प्यात ५० हजार रुपयांची रक्कम दिली होती. उर्वरीत ३० हजार रुपयांची रक्कम नंतर देण्याचे ठरले होते. मात्र काही रक्कम कमी करा अशी तक्रारदाराने विनंती केल्यानंतर प्रकल्प अधिकारी विशालसिंह याने पाच हजार रुपये कमी करून २५ हजार रुपयांची मागणी केली.
दरम्यान, या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. त्यावरून आज लाचलुचपतचे उपाधिक्षक विकास घनवट, पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लु, जमादार भगवान मंडलीक, गजानन पवार, रवींद्र वरणे, राजाराम फुफाटे, विनोद पुंडगे, विजय शुक्ला, अमोल जाधव, शेख अकबर यांच्या पथकाने दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास कार्यालयाच्या परिसरात सापळा रचला होता.
दरम्यान, ठरल्या प्रमाणे तक्रारदार कार्यालयात पैसे घेऊन गेल्यानंतर प्रकल्प अधिकारी विशालसिंह याने २५ हजार रुपयांची लाच स्विकारली. सदर रक्कम स्विकारताच पथकाने त्यास रंगेहात पकडले. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
