
टेंभूर्णी ग्रामपंचायतीचे सेवक असलेले माणिक राऊत यांनी मुलांच्या शिक्षणासाठी घेतले होते १ लाख ५० हजारांचे कर्ज…
——————–
प्रतिनिधी :
———————
‘पत’ राखली तर जीवनात सन्मानाचे व विना अडथळा जीवन प्रवास करता येतो. त्यामुळे आपल्या गरजा कमी करुन ‘पत’ टिकवल्यास मग ती आर्थिक असो, सामाजीक असो की माणुसकीची असो त्याचा सन्मानरुपी फायदा नक्कीच होतो हे विचार तंतोतंत सिद्ध करुन दाखवले आहे वसमत तालुक्यातील टेंभूर्णी येथील ग्रामपंचायत कार्यालयात सेवक पदावर कार्यरत असलेल्या माणिक राऊत यांनी.
माणिक राऊत हे वसमत तालुक्यातील टेंभूर्णी येथील ग्रामपंचायत कार्यालयात सेवक पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांना नौकरीतून मिळणाऱ्या कमी उत्पन्नावर संसाराचा गाडा चालविण्याबरोबरच इतरही आर्थिक गरजा भागवाव्या लागतात. मात्र तुटपुंज्या वेतनात कुटूंबाच्या उदरनिर्वाह व्यतिरीक्त इतर खर्च नसीबी आला तर त्याला कर्ज घेतल्याशिवाय भाग नसते. दरम्यान माणिक राऊत यांच्या मुलाचे उच्च शिक्षण सुरू झाल्यानंतर शिक्षणाची आर्थिक तजबीज करणे राऊत यांना अवघड जात होते. त्यामुळे त्यांनी परिचित असलेल्या वसमत शहरातील महाराष्ट्र अर्बन पतसंस्थेकडून १ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. आता माणिक राऊत यांना आपल्या अत्यावश्यक खर्चाच्या तरतुदीबरोबरच बँकेच्या ४८ हप्त्याची तरतुदही करावी लागली. मात्र राऊत यांनी आपल्या गरजा कमी करीत ‘पत’ राखण्याला पसंती दिली आणि एकही हप्ता न पडता त्यांनी नियमितपणे कर्जफेड केली.
अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतही बँकेचे कर्जफेड करुन ‘पत’ राखलेल्या माणिक राऊत यांचा महाराष्ट्र अर्बन पतसंस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या वेळी संस्थेचे अध्यक्ष रवी भुसावळे, व्यवस्थापक संदिप सुर्यवंशी, ज्येष्ठ पत्रकार संजय बर्दापुरे टेंभूर्णी येथील सरपंच शेख यासीन, सुर्यभान फेगडे, श्री संवडकर, पतसंस्थेचे कर्मचारी चंद्रकांत लांडगे, लक्ष्मीकांत कोटलवार,गणपत खराटे, दिपक जांभळे आदींची उपस्थिती होती
माणिक राऊत यांच पतधोरण इतरांनी राबवावं…
अनेक अडचणी असतानाही कमी वेतनावर काम करणाऱ्या माणिक राऊत यांनी नियमित कर्जफेड केली. हा त्यांचा आदर्श इतर ग्राहकांनी घ्यावा व आपल्या आर्थिक परिस्थितीवर मात करावी असे आवाहन बँकेचे व्यवस्थापक संदिप सुर्यवंशी यांनी केले आहे.
