
वसमत तालुक्यातील हट्टा शिवारात पाहणी, नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश
———————–
प्रतिनिधी :
———————–
हिगोली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः सोयाबीन, उडीद, कापूस आदी पिकांवर कीडरोग आणि शेतात पाणी साचल्याने पिके आडवी होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज बुधवार ता.20 वसमत तालुक्यातील हट्टा येथे थेट शेतीच्या बांधावर प्रत्यक्ष जावून बाधित पिकांची पाहणी केली.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम, स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी जी. बी. बंटेवाड, तालुका कृषी अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी तसेच शेतकरी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी गुप्ता यांनी शेतशिवारात जाऊन सोयाबीन पिकावर पडलेल्या कीडरोगाचा प्रत्यक्ष पाहणी करत शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांनी अतिवृष्टी व रोगराईमुळे निर्माण झालेल्या अडचणी जाणून घेतल्या. शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर सोयाबीन पिकाचे कोमेजलेले रोपे, पाने गळणे, काडांवर कीड लागणे, तसेच मुसळधार पावसामुळे पिके जमिनीत पडल्याची उदाहरणे मांडली.
पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश
या सर्व परिस्थितीचा आढावा घेताना जिल्हाधिकारी गुप्ता यांनी “शेतकऱ्यांचे नुकसान तात्काळ नोंदवून पंचनामे करून अहवाल तयार करावा. कोणत्याही शेतकऱ्याला यासाठी त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तर पंचनाम्यांच्या आधारे शेतकऱ्यांना शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन निधीतून व विविध शेतकरीहिताच्या योजनांमधून मदत मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील राहील, असे त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले. कुठल्याही शेतकऱ्याला मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार योग्य ती मदत तातडीने दिली जाईल, अशा शब्दांमध्ये जिल्हाधिकारी गुप्ता यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी औंढा नागनाथ तालुक्यातील रुपूर तांडा येथे भेट देऊन गौण खनिज साठे येथे भेट देत पाहणी केली.
