
भेंडेगाव शिवारातील घटना : कुरुंदा पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या चार तासात केला घटनेचा उलगडा
———————
प्रतिनिधी :
——————–
अनैतिक संबंधात अडथळा येत असल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची घटना वसमत तालुक्यातील भेंडेगाव शिवारात घडली होती. कुरुंदा पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या चार तासांत खुनाचा उलगडा केला आहे. या प्रकरणी रविवारी ता.२४ दोघांवर कुरुंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
वसमत तालुक्यातील भेंडेगाव शिवारात शिवाजी पोटे (रा. गवलेवाडी, ता. औंढा) हे एका शेतात सालगडी म्हणून काम करतात. या ठिकाणी असलेल्या आखाड्यावर ते व त्यांची पत्नी मंगल, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार राहतो. त्यांचा मुलगा शिरडशहापूर येथील एका शाळेत शिक्षण घेत असल्यामुळे मंगल पोटे हिचे त्या शाळेत जाणे-येणे होते. या दरम्यान तिचे शाळेतील स्वयंपाकी ज्ञानेश्वर ठोंबरे याच्यासोबत प्रेमसंबंध जुळले. त्यातून दोघांत अनैतिक संबंध निर्माण झाले. दरम्यान अनैतिक सबंधावरुन मंगल व शिवाजी मध्ये वाद सुरू झाले. सबंधात पती अडसर ठरत असल्याने मंगल हिने त्याचा काटा काढण्याचे ठरवले. त्यासाठी ज्ञानेश्वर यानेही मदत करण्याचे सांगितले. त्यानुसार शनिवारी मध्यरात्री मंगल व ज्ञानेश्वर यांनी शिवाजी यांना आखाड्याच्या बाहेर बोलावून त्याच्या डोक्यात लाकडाने वार केला. यामध्ये शिवाजी यांचा मृत्यू झाला. यानंतर मृतदेह जवळच असलेल्या नाल्यात फेकून दिला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी ता.२४ सकाळी मंगल हिने मुलांना जागे करून त्यांचे वडील कुठे दिसत नाहीत, त्यांचा शोध घेऊ असा कांगावा केला. त्यानंतर शेतमालकाचा भाऊदेखील आखाड्यावर आला. त्यांनी शोध घेतला असता शिवाजी यांचा मृतदेह सकाळी नाल्यात सापडला. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपाधीक्षक राजकुमार केंद्रे, गुन्हे हे शाखेचे शाखेचे निरीक्षक निरीक्षक मोहन मोहन भोसले, भोसले कुरुंद्याचे सहायक पोलिस निरीक्षक रामदास निरदोडे, गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे आर्दीचे पथक घटनास्थळी भेट दिली.
दोघांनीही दिली खून केल्याची कबुली
पोलिसांनी घटनेची माहिती घेतली. यामध्ये मंगल पोटे देत असलेल्या माहितीमध्ये तफावत होती. मंगल हिचे ज्ञानेश्वर याच्याशी संबंध असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले. या वेळी पोलिसांनी दोघांचीही वेगवेगळी चौकशी केली असता त्यांच्या जबाबात तफावत दिसून आली. पोलिसांनी त्यांना विश्वासात घेऊन माहिती घेतल्यानंतर दोघांनीही खुनाची कबुली दिली.
हालचाली संशयास्पद
या प्रकरणात ज्ञानेश्वरला पोलिसांनी घटनास्थळी आणल्यानंतर त्याने हंबरडा फोडला. मात्र त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याच्यावर संशय व्यक्त करून त्याची चौकशी सुरू केली. पोलिसांनी त्याच्यावर प्रश्नाचा भडीमार केला. पोलिसांच्या प्रश्नाला उत्तर देताना ज्ञानेश्वर चुकला आणि अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
दरम्यान, तुकाराम मिरासे यांच्या तक्रारीवरून कुरुंदा पोलिसांनी ज्ञानेश्वर ठोंबरे, मंगल पोटे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. तपास सहायक पोलिस निरीक्षक निरदोडे करीत आहेत.
