
बोराळा येथे जाऊन घेतली भेट, विचारपुस करीत कुटूंबियांना दिला धीर…
———————–
प्रतिनिधी :
———————–
मराठा आरक्षण यौध्दा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मुंबई येथील आमरण उपोषणाच्या आंदोलनात सहभागी झालेले गोपीनाथ जाधव यांचा रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. दरम्यान खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शुक्रवारी ता.५ बोराळा येथे जाऊन स्व.गोपीनाथ जाधव यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
मराठा आरक्षण यौध्दा मनोजदादा जरांगे पाटील यांनी मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मुंबई येथे आमरण उपोषणा सुरु केले होते. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातून लाखो मराठा बांधव मुंबई येथे गेले होते. वसमत तालुक्यातील हजारो मराठा बांधवही मुंबई येथे आंदोलनात सहभागी झाले होते. त्यात वसमत तालुक्यातील बोराळा येथील गोपीनाथ सोनाजी जाधव वय ४८ हे सुध्दा सहभागी झाले होते. दरम्यान रेल्वे प्रवास करीत असताना ते खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. मुंबई येथील दवाखान्यात उपचार सुरू असताना अखेर त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बोराळा येथे त्यांच्या मुळ गावी अंत्यसंस्कार झाल्यानंतर अनेक मराठा बांधव, विविध पक्षांचे नेते यांनी स्व गोपीनाथ जाधव यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले तसेच आर्थिक मदत केली. शुक्रवारी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी बोराळा येथे जाऊन स्व गोपीनाथ जाधव यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन करीत धीर दिला. तसेच विचारपुस करीत मदतीची ग्वाही दिली. या वेळी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यासह हिंगोली जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, गोपू पाटील, वसमत शहरप्रमुख काशिनाथ भोसले, पिंटू गुजर, डॉ गाजानन पतंगे यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
