गिरीश देशमुख यांची संघटनेच्या वसमत शहराध्यक्षपदी निवड…
———————-
प्रतिनिधी :
———————-
राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवणारी व्हाईस आँफ मिडिया पत्रकार संघटनेने कार्यप्रणाली व सदस्यांच्या रेकाँर्डब्रेक नोंदणीच्या जोरावर गीनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यादीत स्थान मिळवले आहे. त्यामुळे मरगळ झटकून संघटन वाढ व पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन संघटनेचे विभागीय अध्यक्ष डॉ गणेश जोशी यांनी रविवारी ता.२१ केले.

वसमत येथे व्हाईस आँफ मिडिया पत्रकार संघटनेची वसमत तालुका कार्यकारिणीची मासिक बैठक संपन्न झाली. या बैठकीला संघटनेचे विभागीय अध्यक्ष डॉ गणेश जोशी, जिल्हा प्रवक्ते संजय बर्दापुरे, तालुका अध्यक्ष प्रमोदराव नादरे पाटील, नुतन शहराध्यक्ष गिरीश देशमुख यासह तालुका पदाधिकारी, सदस्य यांची उपस्थिती होती. प्रास्ताविकात तालुका अध्यक्ष प्रमोदराव नादरे पाटील यांनी वसमत तालुका संघटनेच्या अडचणी, विविध योजना राबविण्यात येत असलेल्या अडचणी, जिल्हाध्यक्ष नसल्याने निर्माण होत असलेल्या समस्या याबाबत अध्यक्षांना अवगत केले. तसेच वसमत तालुक्यातील संघटनेचे पदाधिकारी अँक्टिव्ह असतानाही वरीष्ठ स्तरावरुन मदत मिळत नसल्याने पत्रकारांमध्ये नाराजीचा सूर असल्याची खंत बोलून दाखवली. यावर विभाग अध्यक्ष डॉ गणेश जोशी यांनी मार्गदर्शन करताना वसमत तालुका संघटनेस सर्वोत्परी मदत करणार असल्याची ग्वाही देऊन येत्या १० आँक्टोबर पर्यंत नविन जिल्हाध्यक्षांची निवड केली जाईल असे सांगितले. तसेच तालुका पातळीवर विविध सामाजिक उपक्रम घेऊन संघटनेची ओळख निर्माण करा असा सल्ला दिला. पत्रकारांसाठी संघटनेचा आरोग्य सेल कार्यरत असून नामांकित खाजगी दवाखान्यात ५० टक्के पर्यंतची उपचारात सूट असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याबरोबरच अधिकारी ओळखत नसतील तर लेखणीतून ओळख निर्माण करा असा सल्ला श्री जोशी यांनी उपस्थित पदाधिकारी, सदस्यांना दिला.
गिरीश देशमुख यांची शहराध्यक्षपदी निवड…
या वेळी व्हाईस आँफ मिडियाच्या वसमत शहराध्यक्षपद निवडीचा कार्यक्रम घेण्यात आला. उपस्थित पत्रकार सदस्यांनी यावेळी सर्वानूमते गिरीश देशमुख यांची वसमत शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यानंतर डॉ गणेश जोशी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच संघटनेच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.


