
औंढा, वसमत तालुक्यात अतिवृष्टी, नदी, ओढ्यांना महापूर, शेती पिके गेली पाण्याखाली तर जनावरे वाहून गेली, कुरुंदा, टेंभूर्णी गावातील अनेक घरात गुडघाभर पाणी…
———————
प्रतिनिधी :
———————
सोमवारी ता.22 रोजी दिवसभर व रात्री झालेल्या परतीच्या मोठया पावसाने हिंगोली जिल्ह्यात हाहाकार उडवला. औंढा तालुका व वसमत तालुक्यात ढगफुटी झाल्याने नदी, ओढ्याला पूर आले. औंढा तालुक्यातील पिंपळदरी येथील एका तरुणाचा ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. तर वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील ओढ्याला आलेल्या पूरात अनेक शेतकरी अडकले होते. त्यांना गावकऱ्यांनी दोरीच्या मदतीने रेस्क्यू केले. याबरोबरच अनेक जनावरे वाहून गेली. कुरुंदा व टेंभूर्णी गावातील अनेक घरात पावसाचे पाणी शिरल्याने अन्नधान्य व संसार उपयोगी वस्तूचा नासाडा झाला. तहसिलदार शारदा दळवी यांनी संबंधीत गावांना भेटी देत नुकसानग्रस्त घरांची व शेतुची पाहणी केली. तसेच तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. आसना नदीला पुर येऊन नदीकाठच्या शेतात पुराचे पाणी शिरल्याने शेती पिके नाहीसे झाल्यात जमा आहेत. आसेगाव, रुंज. गुंज शिवारात याचा मोठा फटका बसला आहे. तसेच वसमत तालुक्यातील भैरोबा चोंडी येथील रस्त्यावरील पुल वाहून गेला. परिणामी गावातील नागरिक व शाळेचे विद्यार्थी रस्त्याच्या एका बाजूला अडकले होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याबरोबरच अनेक गावांत घरांची पडझड झाली असून आता शेतकरी, नागरीकाकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे.
हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 15 मिमी पाऊस….
हिंगोली जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 15.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, औंढा नागनाथ तालुक्यात सर्वात जास्त 32.2 मि.मी. पाऊस झाला आहे. तर हिंगोली व सेनगाव तालुक्यात सर्वात कमी प्रत्येकी 2 मि.मी. पाऊस पडला आहे.
जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 2.0 (888.3), कळमनुरी 12.5 (1087.8), वसमत 31.9 (1058), औंढा नागनाथ 32.2 (1071.3) आणि सेनगाव तालुक्यात 2.0 (830.1) मि. मी. पाऊस पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे.
हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2025 ते 23 सप्टेंबर, 2025 पर्यंत सरासरी 980.3 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 129.1 अशी आहे.
वसमत तालुक्यातील कुरुंदा व औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा या दोन मंडळात अतिवृष्टी झाली आहे. कुरुंदा मंडळात 65.3 मिमी तर जवळा बाजार मंडळात 66.3 मिमी प्रमाणे पावसाची नोंद झाली आहे.
