
वसमत येथील पंचायत समिती सभागृहात घरकुल संदर्भात घेतली ग्रामसेवकाची आढावा बैठक
———————
प्रतिनिधी :
——————–
वसमत तालुक्यात घरकुलाचे काम असमाधानकारक असून घरकुल लाभार्थ्यांचे उर्वरीत ४ हजार प्रस्ताव पुढील दोन दिवसांत सादर करा अन्यथा कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी मंगळवारी वारी ता.23 दिला . त्यासाठी गावपातळीवर शिबीर घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकारी व ग्रामसेवकांना केल्या.
वसमत येथील पंचायत समिती सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांच्या उपस्थितीत मंगळवारी ग्रामसेवकांची बैठक घेतली. यावेळी गटविकास अधिकरी प्रफुल्ल तोटावाड, कक्ष अधिकारी परशल्लू यांच्यासह अधिकारी व ग्रामसेवकांची उपस्थिती होती.
यावेळी अंजली रमेश यांनी घरकुलाचा आढावा घेतला. वसमत तालुक्यात 12500 घरकुल मंजूर असून त्यापैकी 8500 लाभार्थ्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले असून त्यांना पहिला हप्ता वितरीत केल्याचे सांगण्यात आले. मात्र उर्वरीत चार हजार लाभार्थ्यांच्या प्रस्तावाचे काय असा सवाल उपस्थित केला. या लाभार्थ्यांचे प्रस्ताव का दाखल करून घेतले नाही या प्रश्नावर उपस्थित अधिकारी व ग्रामसेवक निरुत्तर झाले. तर हट्टा ग्रामपंचायती अंतर्गत घरकुलाचे काम असमाधानकारक असल्याने त्यांनी दोन दिवसांत कामकाजात सुधारणा करून समाधानकारक प्रस्ताव सादर करा अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला.
वसमत तालुक्यात घरकुलाचा पहिला हप्ता मिळालेल्या लाभार्थ्यांच्या घरकुलाची पाहणी करून तातडीने दुसरा हप्ता वितरीत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या शिवाय शिल्लक असलेल्या 4000 लाभार्थ्यांचे प्रस्ताव गावपातळीवर शिबीर आयोजित करून घ्यावेत. त्यांच्या अडीअडचणी गावपातळीवरच दुर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्यासाठी सहाय्यक गटविकास अधिकारी, विस्तार अधिकाऱ्यांचे पथक स्थापन करून ज्या गावात जास्त प्रस्ताव प्रलंबित आहेत त्या ठिकाणी प्राधान्याने भेटी देऊन प्रस्ताव घ्यावेत. पुढील दोन दिवासंत समाधानकारक प्रस्ताव घ्यावेत अन्यथा कारवाई करण्याचा इशारा मुख्यकार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी दिला आहे. सीईओ अंजली रमेश यांच्या ईशार्यानंतर आता घरकुल योजनेला गती मिळेल अशी अपेक्षा लाभार्थी व्यक्त करीत आहेत.
