
पुरस्काराचे दहावे वर्ष, प्रांतवादाच्या सीमा पुसून स्नेह निर्माण करण्याचा वसमत आंतरभारतीचा संकल्प…
———————
वसमत :
———————
आंतरभारती वसमत शाखेच्या वतीने दिला जाणारा स्नेहसंवर्धन पुरस्कार यंदा शहरातील केशकर्तनकार श्रीनिवास राजय्या निलुगोंडा (मुळचे करीमनगर, तेलंगाना) यांना स्नेहनगर काॕलनी सभागृहात पार पडलेल्या एका शानदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते रविवारी ता.२८ प्रदान करण्यात आला. त्याबरोबरच वसमत शाखेतील सक्रिय सदस्याला दिला जाणारा सक्रीय कार्यकर्ता पुरस्कार अपर्णा तनपुरे यांना प्रदान करण्यात आला.
परराज्यातून येऊन वसमत शहरात स्थायिक होऊन आपल्या व्यवसायात जम बसवण्या बरोबरच इथल्या मातीशी एकरूप होत पु. साने गुरुजींची मानवतेची संकल्पना प्रत्यक्षात उतरविणा-या व्यक्तीला दरवर्षी वसमत आंतरभारती शाखेतर्फे स्नेहसंवर्धन पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. या पुरस्काराचे हे दहावे वर्ष असून यातून प्रांतवादाच्या सीमा पुसल्या जाऊन आपापसात स्नेह निर्माण व्हावा ही या पुरस्कारा मागील संकल्पना आहे.
वसमत शहरातील स्नेहनगर मधील सांस्कृतिक सभागृहात पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आंतरभारती वसमत शाखेचे अध्यक्ष अनंत साधू तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. चैतन्य शिक्षण संस्थेचे सचिव अॕड. रामचंद्रराव बागल, आंतरभारतीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा संगिता देशमुख यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी व साने गुरुजी यांच्या प्रतिमांचे पूजन करुन करण्यात आली. त्यानंतर महात्मा गांधी विद्यालयातील कु. दिव्या सोनटक्के हिने “हीच आमुची प्रार्थना आन् हेच आमुचे मागणे” हे गीत सादर केले. शिवाजीराव सुर्यवंशी यांनी प्रास्ताविकातून आंतरभारतीचे कार्य आणि स्नेहसंवर्धन पुरस्कार देण्यामागील भूमिका विषद केली. यानंतर यावर्षीचे स्नेहसंवर्धन पुरस्काराचे मानकरी श्रीनिवास राजय्या निलुगोंडा यांना सपत्नीक शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र युक्त स्नेहसंवर्धन पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. यानंतर वसमत आंतरभारतीच्या सदस्या अपर्णा तनपुरे यांना सक्रीय सदस्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सत्कारमुर्ती श्रीनिवास अण्णा यांनी सत्काराला उत्तर देताना आंतरभारतीने आपली दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान केल्यामुळे अत्यानंद झाल्याच्या भावना व्यक्त केली. एकमेकांची मने जोडण्याच्या या कार्याबद्दल त्यांनी आंतरभारतीचे कौतुक केले. प्रमुख अतिथी अॕड. बागल यांनी देखील आजच्या द्वेषपूर्ण वातावरणात एखादी संस्था प्रांताच्या सीमा आशा पुरस्कारातून पुसण्याचा करत असलेला प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त केले. आंतरभारतीच्या उपाध्यक्षा संगिता देशमुख यांनी आंतरभारती ही मानवतेचा धर्म जोपासणारी संस्था असून शांततामय सहजीवनासाठी सर्वांनी या धर्माची कास धरावी असे आवाहन केले.
कार्यक्रमाला व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुभाष लालपोतू, बालासाहेब महागावकर, शामसेठ डिगुळकर महादेव कापुसकरी, माजी नगराध्यक्ष तथा शिवेश्वर बँकेचे अध्यक्ष शिवदास बोड्डेवार,
माजी उपनगराध्यक्ष सिताराम म्यानेवार , महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विकास मस्के यांच्यासह आंतरभारती वसमत शाखेच्या सदस्य आणि नागरिकांची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमाची सांगता संजय जिंतुरकर यांनी साने गुरुजींचे “खरा तो एकचि धर्म” हे गीत गाऊन केली.
कार्यक्रमाचे संचलन अर्चना कल्याणकर तर आभार प्रदर्शन विश्वास कदम यांनी केले.
