
बाल कुपोषण मुक्त हिंगोली जिल्हा आणि महिला सशक्तीकरणासाठी मॉनिटरींग ॲप तयार करावा…
——————-
प्रतिनिधी :
——————
सातबारा व आठ अ मध्ये पुरुषासोबतच महिलांच्या नावाची नोंद घेण्यासाठी महिला व बालविकास तसेच बचतगटामार्फत विशेष मोहिम राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी गुरुवारी ता.९ आयोजित बैठकीत दिले.
जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची तसेच जिल्हास्तरीय बेटी बचाव बेटी पढाव या योजनेंतर्गत गठीत टास्क फोर्सची बैठक गुरुवारी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय बोराटे, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी एस. आर. दरपलवार, महिला व आर्थिक विकास महामंडळाचे झिंजाडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी, अशासकीय सदस्य उपस्थित होते.
मिशन वात्सल्य योजनेंतर्गत शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण विभागामार्फत बाल कुपोषण मुक्त हिंगोली जिल्हा करण्यासाठी आणि महिला सशक्तीकरणासाठी मॉनिटरींग ॲप तयार करावा. यामध्ये गर्भवती व स्तनदा महिलांचे स्वास्थ्य, गर्भशिशु व जन्मलेले शिशु या सर्व इंडिकेटरनुसार डाटा तयार करण्यासाठी ॲपचा उपयोग करावा. यासाठी आठ दिवसात प्रस्ताव सादर करावा. यामुळे प्रत्येक महिला व मुलांचा डेटा ट्रँकींग करणे सोयीचे होणार आहे. यासाठी मिशन संजीवनी अभियानाच्या डेटाचाही उपयोग घ्यावा. तसेच शाळेबाहेरील मुलींची माहिती स्वयंसेवी संस्थेमार्फत जमा करुन सादर करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिल्या.
हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये समुपदेशन केंद्र सुरु करण्यासाठी व तेथे समुपदेशकाला बसण्याची व्यवस्था करावी. तसेच जिल्ह्यातील सर्व बसस्थानकावरील महिलांसाठीचे स्वच्छतागृह स्वच्छ राहतील याची दक्षता घ्यावी. स्वच्छतागृह व साफसफाई नियमित होते की नाही याची शहानिशा करण्यासाठी अचानक धाडी टाकून पाहणी करावी. यात उणिवा आढळून आल्यास त्याचा अहवाल मला द्यावा. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी सांगितले.
जिल्ह्यातील महिलांचे लिंग गुणोत्तर प्रमाण कमी आहे. ते वाढविण्यासाठी बेटी बचाव बेटी पढाव मोहिमेअंतर्गत जनजागृती मोहिम राबवून प्रभावी अंमलबजावणी करावी. जिल्ह्यात पीसीपीएनडी ॲक्टची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज आहे. गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी करताना आधार कार्ड, मोबाईल क्रमांक व जन्म प्रमाणपत्र घ्यावे. जोखीमग्रस्त गर्भवतीची माहिती समितीला अवगत करावी, असे सांगून महिला व मुलींसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेचा आढावा जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी घेतला.
