सोमवारी पंचायत समिती सदस्य आरक्षण सोडतीसाठी तालुकानिहाय विशेष सभा..
——————–
प्रतिनिधी :
——————-
हिंगोली जिल्ह्यातील पाचही पंचायत समित्यांतील सभापती पदांसाठी आरक्षणाची सोडत शुक्रवार ता.१० नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे पार पडली. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत पद्धतीने प्रक्रिया पार पडली.
या सोडतीत पंचायत समितीनिहाय सभापती पदांचे आरक्षण पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे.
वसमत-अनुसूचित जाती, औंढा नागनाथ – अनुसूचित जमाती (महिला), सेनगाव – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), कळमनुरी – सर्वसाधारण आणि हिंगोली – सर्वसाधारण (महिला) प्रवर्गास सभापती पद निश्चित करण्यात आले आहे.
या सोडतीच्या प्रक्रियेस संबंधित अधिकारी तसेच विविध पंचायत समित्यांचे प्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते.
नगर परिषद पाठोपाठ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यक्रमात नगराध्यक्ष, नगरसेवक व सभापती पदांचे आरक्षण जाहीर झाल्याने एकाचवेळी शहर आणि ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. आरक्षणाचा पेच निर्माण झालेल्या इच्छूक पुरुष मंडळींनी आपल्या सौभाग्यवतींना निवडणुकीत उतरवण्याची तयारी सुरू केली आहे.
सोमवारी पंचायत समिती गणाची आरक्षण सोडत…
सोमवारी ता.१३ रोजी हिंगोली जिल्ह्यातील पाचही पंचायत समिती सदस्य निवडून देण्यासाठी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. यात सोमवारी सकाळी ११ वाजता हिंगोली येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय सभागृह, कळमनुरी येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय सभागृह, औंढा नागनाथ येथे तहसिल कार्यालय, सेनगाव येथे तहसिल कार्यालय तर वसमत येथे सुरमणी कै दत्ता चौगूले सांस्कृतिक सभागृहात विशेष सभा घेतली जाणार आहे. याबरोबरच सोमवारी सकाळी १२ वाजता जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात विशेष सभा घेतली जाणार आहे.
जिल्हा परिषद अथवा त्या- त्या पंचायत समितीतील रहिवाशांनी सभेसाठी नियोजित ठिकाणी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
