वसमत तालुक्यातील गणेशपुर येथील घटना, गावकऱ्यांत हळहळ, वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद
———————
प्रतिनिधी :
———————
वसमत तालुक्यातील गणेशपुर येथे नापिकी व कर्जाला कंटाळून ४३ वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सोमवारी ता. ८ वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांतून हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशपुर येथील शेतकरी सखाराम वाघमारे (४३) यांना त्यांच्या नावे ७२ गुंठे शेत आहे. या शेतीवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. या शेतीवर त्यांनी वसमत येथील भारतीय स्टेट बँक शाखेतून सुमारे ८० हजार रुपयांचे पिककर्ज काढले होते. या शिवाय बचतगटाची काही रक्कम देखील उचलली होती.
मात्र यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतातील पिके खरडून गेली. त्यामुळे आता पिककर्ज कसे फेडावे याची चिंता त्यांना सतावत होती. त्यामुळे मागील काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते. नापिकीमुळे कर्ज कसे फेडावे याबाबत ते नेहमीत घरी बोलत होते.
दरम्यान, घरची सर्व मंडळी शेतात गेली असतांना त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांची पुतणी शाळेतून घरी आल्यानंतर तिला हा प्रकार लक्षात आला. तिने तातडीने आरडा ओरड करून मदत मागितली तसेच शेतातील कुटुंबाला माहिती दिली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक एस. एम. कांबळे, आंबादास विभुते, विजयकुमार उपरे यांच्य पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मयत सखाराम वाघमारे यांच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
या प्रकरणी ओमकार वाघमारे यांच्या माहितीवरून वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात सोमवारी ता. ८ अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक कांबळे पुढील तपास करीत आहेत.


