३० लाखांचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हा शाखेची कामगिरी, ६ दरोडेखोर पोलिसांच्या ताब्यात, कापडशिंगी येथील बँक फोडल्याची ही दिली कबुली…
——————-
प्रतिनिधी :
——————-
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत धानोरा शिवारात कापडशिंगी ते लोणार महामार्गावर दरोडेखोरांच्या टोळीने सोनार व्यावसायिकाची दुचाकी आडवुन तसेच चाकूचा धाक दाखवून जबरीने ३०लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने पळविल्या ची घटना ३० जानेवारी रोजी घडली होती. हिंगोली स्थानिक गुन्हा शाखा व सेनगाव पोलिसाच्या पथकाने ६ दरोडेखोरांच्या मुस्क्या आवळत त्यांच्याकडून तीस लाख रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज जप्त केला आहे. अधिक तपासात सदरील दरोडेखोरांनी कापडसिंगी येथील बँक फोडल्याची कबुली माहिती मिळाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव पोलीस ठाणे हद्दीतील कापडसिंगी ते लोणार महामार्गावर सोनार व्यावसायिक सुरेश खंदारकर वय ३७ रा.लोणार जि बुलढाणा हा ३० जानेवारी २०२६ रोजी कापडसिंगी येथील दुकानाचे कामकाज आटोपल्यानंतर सोबत सोन्या चांदीचे दागिने घेऊन दुचाकीवर लोणारकडे जात असताना दुचाकीवर आलेल्या तीन अनोळखी इसमांनी त्यांचा पाठलाग करून दुचाकी खाली पाडली. तसेच त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळ असलेले ११४ ग्रॅम सोने व ३६०० ग्रॅम चांदीचे दागिने, मोबाईल, रोख रकमेसह ३० लाख रुपयांचा मुद्देमाल पळविला होता.
या गुन्हे संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ निलाभ रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, हिंगोली ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे यांनी भेट देऊन सदरील गुन्ह्याचा तपास लावण्याबाबत स्थानिक गुन्हा शाखा व सेनगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुना शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांभ घेवारे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप मोरे, सेनगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के, पोलीस उपनिरीक्षक रविकिरण खंदारे यांच्या पथकाने तपास सुरू केला होता.
सदरील पथकाने गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सीसीटीव्ही फुटेज व इतर गोपनीय माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा हा परमेश्वर उर्फ सागर पडोळकर वय २९ वर्ष रा आखणी ता मंठा जि जालना, राहुल पवार वय २९ वर्ष रा मोहाडी तांडा जि जालना, शोयब हमीद पठाण वय २४ वर्ष रा एकबालनगर सेलू जि परभणी, अभिषेक धनवडे वय २२ वर्ष रा आरडा तोलाजी ता मंठा जि जालना, भगवान हराळ वय २८ वर्ष, तुकाराम हराळ वय ३० वर्ष दोघे रा कापडसिंगी ता सेनगाव जि हिंगोली यांनी कट रचून सोनारास लुटल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार आरोपी एक ते चार यांना वाटुर फाटा जिल्हा जालना येथून ताब्यात घेऊन विचारपूस केले असता त्यांनी कापडशिंगी येथील आरोपी पाच ते सहा यांनी सोनाराची टीप दिल्याचे कबूल केले. ताब्यात घेतलेल्या ६ आरोपीकडून गुन्ह्यात लुटलेला ११ तोळे ४ ग्राम सोने, ३ किलो ६०० ग्रॅम चांदीचे दागिने व मोबाईल असा एकूण ३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यापैकी काही आरोपींनी कापडसिंगी येथील बँक फोडल्याचे सुद्धा तपासात सिद्ध झाले आहे.


