पवित्र ईद-उल-फित्र रमजान ईद निमित्त घरोघरी भेटी देत शीरखुर्मा चा घेतला स्वाद…
——————-
प्रतिनिधी :
——————-
वसमतला पवित्र ईद-उल-फित्र रमजान ईद निमित्त शनिवार ता.२१ मुस्लिम बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून नमाज अदा केली. यावेळी उपस्थित प्रशासनातील अधिकारी, विविध पक्षिय नेते आणि हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देत ऐक्याचा संदेश दिला.

भारतात शाबान महिन्याच्या शेवटी-शेवटी चंद्र दिसल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून रमजान महिन्यात सुरुवात होते. त्यानंतर मुस्लिम बांधव मोठ्या भक्ती भावाने महिनाभर रोजाचे उपवास धरतात. रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवार ता.२० सायंकाळी ६.३० च्या सुमारास चंद्र दर्शन झाले. त्यानंतर दिवशी शनिवारी मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी करण्यात आली. यासाठी शनिवारी सकाळपासून शहरातील ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी गर्दी केली होती. तसेच विविध प्रशासनातील अधिकारी, विविध राजकीय मंडळी, व्यापारी मंडळी व हिंदू बांधवांनी ईदगाह मैदानावर शुभेच्छा देण्यासाठी उपस्थिती लावली होती. शिस्तबद्ध पद्धतीने नमाज सुरू होताच सर्व परिसर भक्ती भावाने भारावून गेला.

नमाज नंतर उपस्थित आणि मुस्लिम बांधवांची गळा भेट घेत रमजान ईद च्या शुभेच्छा दिल्या. यामध्ये आमदार राजू भैया नवघरे, कपिश्वर शुगर प्रा लि चे अध्यक्ष आतिश भैया दांडेगावकर, नगराध्यक्ष प्रतिनिधी कन्हैया बाहेती, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुभाष लालपोतू यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व नागरीकांची उपस्थिती होती.
नमाज नंतर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मुस्लिम बांधवांच्या घरी सर्व धर्मातील बांधवांनी भेट देत शीरखुर्माचा स्वाद घेतला. एकमेकांना गळाभेट देत शुभेच्छांची देवाण-घेवाण करण्यात आली. या निमित्ताने वसमतला सर्वधर्मसमभावाच्या एकोप्याचे दर्शन झाले. सर्वत्र आनंद उत्साह आणि शांततेचे वातावरण पाहायला मिळाले.


