पांगरा शिंदे शिवारात ३५ ते ४० घरांना तडे; महसूल पथकाकडून तातडीने पंचनामे सुरू
——————–
साईनाथ पतंगे
——————-
हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांना शनिवारी सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी ४.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा जोरदार धक्का बसला. अचानक झालेल्या या हादऱ्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून अनेक जण घाबरून घराबाहेर पडले. प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भूकंपाचा सर्वाधिक फटका पांगरा शिंदे शिवाराला बसला असून प्राथमिक माहितीनुसार ३५ ते ४० घरांना तडे गेल्याचे समोर आले आहे. काही कच्च्या घरांच्या भिंतींना गंभीर भेगा पडल्या असून काही घरांवरील पत्रे खाली कोसळल्याची माहिती आहे. काही ठिकाणी भिंतींचे नुकसान झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही या गावातील काही घरे आणि सामुदायिक इमारतींना तडे गेल्याची पुष्टी करण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी विकास माने आणि नायब तहसीलदार विनोद डोणगावकर यांनी महसूल पथकासह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. नुकसानग्रस्त घरांची प्रत्यक्ष तपासणी करून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंचनाम्यांचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात येणार असून नुकसानग्रस्तांना मदतीबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
सुदैवाने या भूकंपात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. मात्र अचानक झालेल्या या धक्क्यामुळे हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांतील अनेक भागांत नागरिक काही काळ भयभीत अवस्थेत होते.
पांगरा शिंदे गावाला आजवरचा
सर्वात मोठा धक्का
पांगरा शिंदे गाव आणि परिसरात २०१७ पासून वेळोवेळी भूकंपाचे धक्के जाणवत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. यापूर्वी येथे ४.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का जाणवला होता. मात्र यावेळी झालेला ४.७ रिश्टर स्केलचा भूकंप हा आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
गावकऱ्यांनी वारंवार प्रशासनाकडे कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी केली असतानाही ठोस तोडगा निघालेला नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दिवसेंदिवस वाढणारी भूकंपाची तीव्रता पाहता ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.


