
वसमत : वसमत येथील पी. एम. श्री. जवाहर नवोदय विद्यालाची विद्यार्थिनी रेवती भगत (13
वर्ष) या विद्यार्थिनीने ‘ भरत नाट्यम ‘ सारख्या दक्षिण भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकारात प्रथम क्रमांक पटकावत ऊंच भरारी घेतली आहे.
28 एप्रिल ते 30 एप्रिल 2025 ला संपन्न झालेल्या “अखिल नटराजम आंतर सांस्कृतिक संघ, नागपुर द्वारा आयोजित “17 व्या अखिल भारतीय राष्ट्रीय कला नृत्य स्पर्धा आणि समारोहा मध्ये वसमत येथील जवाहर नवोदय विद्यालयाची विद्यार्थिनी रेवती भगत हिने सहभाग घेतला होता. या स्पर्धेत रेवतीने प्रथम क्रमांक प्राप्त करुन हिंगोली जिल्ह्याचे नाव सुवर्णाक्षरांत नोंदविले आहे.
रेवतीने बालपणापासून नृत्याची आवड जोपासली आणि या नृत्य प्रकाराचा ती निरंतर सराव करीत होती.
‘भरतनाट्यम’ ही प्राचीन सम्मानित दक्षिण भारतीय नृत्य शैली आहे , या नृत्यात आकर्षक मुद्रा, मनमोहक वस्त्रआभूषण, भावपूर्ण अभिव्यक्ति आणि आकर्षक लय दर्शविली जाते.
रेवती भगत हिने यापूर्वी देखील या संस्थेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय ऑनलाइन नृत्य स्पर्धेमध्ये ‘भरत नाट्यम’ या शास्त्रीय नृत्य प्रकारात आणि ‘लावणी’ या लोकनृत्य प्रकारात देखील प्रथम स्थान प्राप्त केले होते.
ती आपल्या यशाचे श्रेय तिचे गुरु, आई-वडील, शिक्षक आणि संगीत शिक्षिका यांना देते. तसेच या यशाबद्दल प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक समितीच्या वतीने अभिनंदन केले आहे.
