पहिल्या टप्प्यात १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समिती साठी होणार निवडणूक, १६ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात…
——————
प्रतिनिधी :
——————
राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा झाली आहे. राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ही घोषणा केली. 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून 7 फेब्रुवारीला मतमोजणी होईल. 16 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल.
‘या’ 12 जिल्हा परिषदांसाठी होणार निवडणूक
दिनेश वाघमारे यांनी सांगितले की, 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समितीसाठी राज्यात निवडणूक होईल. यात कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव व लातूर या 12 जिल्हा परिषदांचा समावेश आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम
जिल्हाधिकारी प्रसिद्धी – 16 जानेवारी
अर्ज स्वीकारणे – 16 ते 21 जानेवारी
छाननी – 22 जानेवारी
उमेदवारी माघारीची अंतिम मुदत – 27 जानेवारी (दुपारी 3 )
अंतिम उमेदवारी यादी आणि चिन्हे वाटप – 27 जानेवारी (दुपारी साडे तीन नंतर)
जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदान – 5 फेब्रुवारी (साडे सात ते साडे पाच)
मतमोजणी – 7 फेब्रुवारी (सकाळी दहा पासून)
मतदारांना 2 मते द्यावे लागणार –
या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला 2 मते द्यावे लागतील. यातील एक मत जिल्हा परिषद व दुसरे पंचायत समितीसाठी असेल. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबवण्यात येईल. विविध राजकीय पक्ष व उमेदवारांच्या मागणीनुसार ही प्रक्रिया महापालिका निवडणुकीसारखीच राबवण्यात येत आहे. या निवडणुकीत ज्या जागा राखीव आहेत. त्या जागांवर जातवैधता पडताळणी आवश्यक आहे. जातप्रमाणपत्र व जातवैधता पडताळणी उमेदवारी अर्जासोबत सादर करणे महत्त्वाचे आहे. पण एखाद्या उमेदवाराकडे जात वैधता प्रमाणपत्र नसेल, तर त्याने जात पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा अन्य पुरावा सादर करावा लागेल. पण निवडून झाल्यानंतर त्याला 6 महिन्यांच्या आत आपले प्रमाणपत्र सादर करावे लागेल. अन्यथा त्याची निवड रद्द होईल, असे वाघमारे म्हणाले.
दुसऱ्या टप्प्यात इतर जिल्हा परिषद –
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण मर्यादा 50 टक्क्यांच्या वर गेलेल्या जिल्हा परिषदांची निवडणूक दुसऱ्या टप्प्यांमध्ये घेतली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला 15 दिवसांची मुदतवाढ दिल्याने आता 15 फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींच्या निवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण करणे निवडणूक आयोगाला बंधनकारक असणार आहे. एकीकडे राज्यात 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणुकांसाठी मतदान होत असून 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे, महानगरांमध्ये निवडणुका संपताच, ग्रामीण महाराष्ट्रात निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.
पंचायत समित्यांच्या जागांचा तपशील
-एकूण पंचायत समित्या- 125
-एकूण जागा- 1,462
-महिलांसाठी जागा- 731
-अनुसूचित जातींसाठी जागा- 166
-अनुसूचित जमातींसाठी जागा- 38
-नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी जागा- 342
1 जुलै 2025 ची मतदार यादी अंतिम
या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 ची मतदार यादी वापरली जाईल. ही यादी केंद्रीय निवडणूक आयोगाने पुरवली आहे. 3 नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. 27 नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. या मतदारयाद्या केंद्रीय निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे त्यात कोणतेही नाव समाविष्ट करणे किंवा वगळण्याचे काम राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत येत नाही.
एकूण मतदान केंद्र 25,482
निवडणूक आयुक्तांनी सांगितले की, या निवडणुकीत 25, 482 एवढी मतदान केंद्र आहेत. ही निवडणूक ईव्हीएमद्वारे होईल. यात 51, 537 कंट्रोल यूनिट, तर 1 लाख 10 हजार 329 एवढे बॅलेट यूनिट्स वापरले जातील. सर्व मतदान केंद्रांवर मतदारांसाठी पिण्याचे पाणी, सावलीची सुविधा, शौचालय आदींची व्यवस्था केली जाईल. काही मतदान केंद्र हे आदर्श मतदान केंद्र म्हणून निर्माण केले जातील. काही मतदान केंद्र हे पिंक स्वरुपाचे असतात. पिंक मतदान केंद्रावर महिला मतदारांची संख्या जास्त असेल. त्यात सर्व निवडणूक अधिकारी, कर्मचारी व सुरक्षा कर्मचारी ह्या महिला असतील.


