वसमत येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आढावा बैठक संपन्न, उमेदवार निवडीचे सर्वाधिकार स्थानिक नेत्यांना...
——————-
प्रतिनिधी :
——————
वसमत येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आढावा बैठक शनिवारी ता.१ संपन्न झाली. या बैठकीत आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीबाबत पदाधिकारी यांनी आपले मत मांडले. जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी मार्गदर्शन करताना आम्ही साम आणि दामात थोड कमी पडतोल पण दंडात नाही असे आक्रमक बोलल्यानंतर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी तोच धागा पकडत संदेश देशमुख यांना उद्देशून प्रमुख तुम्ही साम आणि दंडाची तयारी ठेवा मी दामाच बघून घेतो असे म्हणत निवडणूकीचे दंड थोपटले. तसेच बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आमच्याकडे महिला जिल्हाप्रमुख डॉ रेणूकाताई पतंगे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. त्यांच्यासाठी आम्ही प्रयत्न करुत असे सांगितले.

या वेळी नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या महिला जिल्हाप्रमुख डॉ रेणूकाताई पतंगे यांनी आक्रमक होत पक्षश्रेष्ठींसमोर आपले पक्षातील योगदानाची माहिती दिली. तसेच वसमत नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिलेला आरक्षीत झाले असल्याचे सांगून रितसर उमेदवारीची मागणी केली. यावर बोलताना खासदार आष्टीकर यांनी तुम्ही स्थानिक नेते मंडळींनी उमेदवार ठरवावा मी त्यांना तिकीट देतो पण कृपया करुन उमेदवार निवडीचे माझ्या अंगावर ढकलू नका सुनिल भाऊ हे कोढं तुम्हीच सोडवा म्हणत स्थानिक प्रमुख नेत्यांनी बसून हा प्रश्न मार्गी लावावा मी तुमच्यासोबत हाडाचं पाणी करायला तयार आहे अस म्हणत पदाधिकारी यांना विश्वास दिला. वसमत मतदारसंघ शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बालेकिल्ला असून जिल्हा परिषद पंचायत समिती व वसमत नगरपालिकेवर आपला भगवा फडकण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन उपस्थितांना केले. यावेळी जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी परखडपणे आपले मत मांडले. आम्ही कुठल्याही परिस्थितीत पक्षाचे नुकसान होऊ देणार नसून याबाबत आपण आघाडीचे नेते माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांना बोलून आपण शिवसेनेच्या पाठीमागे उभे राहण्याची विनंती करणार असल्याचे म्हणाले. बैठकीला खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यासह जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, सहसंपर्कप्रमुख सुनील काळे, महिला जिल्हाप्रमुख डॉ रेणूका पतंगे, उपजिल्हा प्रमुख अनिल कदम, शहर प्रमुख काशिनाथ भोसले माजी नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवार, राजू भोसले, यासह आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


