
सुरमणी प्रा दत्ता चौगूले स्मृती श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त संगीत महोत्सवात वसमतकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…
——————–
प्रतिनिधी :
——————-
कान्हा रे ..या शास्त्रीय संगीताच्या रागाने सुरुवात झालेल्या या महोत्सवात एकापेक्षा एक सरस शास्त्रीय संगीताचे राग व विविध भावगिताने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. हार्मोनियम, व्हायोलिन चा सूर व तबल्याचा ताल पुर्ण सभागृहात गुंजत राहिला.
येथील प्रा दत्ता चौगूले सांस्कृतिक सभागृहात सुरमणणी प्रा दत्ता चौगूले स्मृती श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त संगीत महोत्सवाचे आयोजन शुक्रवार ता.१५ करण्यात आले होते. या वेळी व्यासपीठावर माजीमंत्री डॉ जयप्रकाश मुंदडा, माजी नगराध्यक्ष अ.हफिज अ.रहेमान, शिवदास बोड्डेवार, सुनिल काळे, श्रीनिवास पोराजवार, कुमूदिनी बडवणे, डॉ मारोती क्यातमवार, सुभाष भोपाळे, माजी उपनगराध्यक्ष सिताराम म्यानेवार, डॉ युवराज बेंडे, सचिन दगडू यासह नगर परिषद प्रशासनाच्या वतीने धोंडीराम दळवी, अरविंद शिकारी याची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पुजनानंतर संगीत सोहळ्यास सुरुवात झाली. तत्पूर्वी सुरमणी प्रा दत्ता सांस्कृतिक सभागृहाच्या निर्मिती प्रक्रीयेत वर्तमानपत्रात वेळोवेळी लिखान करुन शासन, प्रशासनास अवगत केल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार तथा ‘शिव सकाळ’ चे संपादक संजय बर्दापुरे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
चेन्नई येथील गायक सौरभ नाईक यांच्या ‘कान्हा रे ‘ या शास्त्रीय संगीताच्या रागाने संगीत सोहळ्यास सुरुवात झाली. त्यानंतर मुंबई येथील गायिका आसावरी बोधनकर-जोशी यांनी ‘नाही खरचले कवडी दमडी..नाही वेचला दाम..बाई मी विकत घेतला श्याम..हे लोकप्रिय भावगीत गाऊन सभागृहात नवचैतन्य आणले. श्रावण महिन्याचे औचित्य साधत सौरभ नाईक यांनी ‘जय शंकरा..गंगाधरा’ हे महादेवाचं नाट्य पद गायले. ‘सुखाचे जे सुख…श्रीहरी मुख..पाहता ही भुक तहान गेली’ हे आसावरी जोशी व ‘पंढरी निवासा ..सखा पांडुरंगा ‘ या भक्तीगिताने संत नामदेवांच्या ओव्यांना उजाळा दिला. ‘माझे माहेर पंढरी..आहे भिवरीच्या तिरी ‘ या पंडित भिमसेन जोशी यांनी गायलेले लोकप्रिय भक्तिगीताचे तेवढ्याच पहाडी आवाजात सौरभ नाईक यांनी सादरीकरण केले. यानंतर आसावरी जोशी व सौरभ नाईक यांनी ‘ पांडूरंग नामी, मर्म बंधातली, उगवला चंद्र पुनवेचा, घाई नको बाई अशी, या नवल नायनोत्सवा, पद्मनाभा नारायणा, नंद मुकुंदा मुरारी सावळा, हरी म्हणा तुम्ही गोविंद, नंद किशोरा चित्ताचाकोरा, भाजे मुरलीया बाजे आणि ‘अगा वैकूंटीच्या राया’ भैरवी गात एकापेक्षा एक सरस शास्त्रीय व लोकप्रिय भक्तिगीताचे सादरीकरण केले. त्यांना विनायक चौधरी यांची हार्मोनियम , प्रशांत गाजरे तबला, पंकज शिरभाते व्हायोलिन, विश्वेश्वर जोशी पखवाज, प्रकाश सोनकांबळे तबला यांनी सुरेख साथ दिली. वसमतकर रसिकांना अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर याची देही याची डोळा संगिता सोहळ्याचा अनुभव डोळ्यात साठवता आला. कार्यक्रमाला वसमत सह परिसरातील नागरीकांनी उपस्थिती लावत सभागृह फुल्ल केला होता. प्रसिद्ध बासरी वादक ऐनोद्दीन वारसी यांच्या बासरी वादनानंतर रात्री १२ वाजता पाळणा गाऊन श्रीकृष्ण जन्म सोहळा साजरा केला. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
तत्पूर्वी उपस्थित मान्यवरांचा परीचय प्रा दत्ता चौगूले समन्वय समितीचे सदस्य गजानन पाठक यांनी करुन दिला. सुत्रसंचलन समितीचे अध्यक्ष प्रकाश इंगळे यांनी केले. आभार सदस्य सुनिल कबाडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे अध्यक्ष प्रकाश इंगळे, गजानन पाठक, आनंद बडवणे, लक्ष्मीकांत धानोरकर, मनोज चव्हाण, प्रा पंजाब अंभोरे, आदित्य देशपांडे, प्रा बी डी कदम, विशाल पतंगे, अँड राजा कदम, प्रविण शेळके आदींनी पुढाकार घेतला.
