नागरीकांच्या अज्ञानाचा फायदा घेत बँक खात्यावर घेतला ताबा, वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल..
——————–
प्रतिनिधी :
———————
बँक खाते चालविण्यासाठी घेऊन सायबर फ्राॅड करणाऱ्या राजस्थानातील दोन तरुणांसह तिघांना वसमत शिवारात पोलिसांच्या पथकाने रविवारी ता.२६ मध्यरात्री छापा मारुन पकडले. याबाबत वसमत शहर पोलिस ठाण्यात सोमवारी ता. २७ पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून चौकशी सुरू आहे. तसेच ताब्यात असलेल्या राजस्थानातील दोघावर देशभरात २० गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थान मधील दोन तरुण वसमत शहरालगत आले असून ते काही नागरीकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत त्यांचे बँक खाते चालविण्यासाठी घेऊन फ्रॉड करीत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे पथक नियुक्त करण्यात आले होते.
यामध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, जमादार गजानन पोकळे, भुजंग कोकरे, आकाश टापरे, साईनाथ कंठे, शिवजारी जालमोटे, नरेंद्र साळवे, ज्ञानेश्वर गोरे, हरिभाऊ गुंजकर, दत्ता नागरे, महिला पोलिस कर्मचारी सुनीता मोरे यांच्या पथकाने मागील दोन दिवसापासून वसमत शिवारात पाळत ठेवली होती. अधिक माहिती घेतल्यानंतर सदरील तरुण हे राजस्थानातील असल्याचे स्पष्ट झाले होते.
रविवारी ता.२६ मध्यरात्री पोलिसांच्या पथकाने वसमत शिवारात छापा टाकला. यामध्ये एका हुंदाई वेणू कारमधे तिघे जण ऑनलाईन ट्रेडींग करीत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असता त्यांनी त्यांची नांवे मनोज शर्मा (रा. हमीरगड, राजस्थान), प्रल्हाद स्वालका (रा. चंदोरीया, राजस्थान), ंमनोज स्वामी (शिरडशहापूर, जि. हिंगोली) असे असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांच्याकडून एक कार, दोन लॅपटॉप, एक मोबाईल असा १३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक घेवारे यांच्या तक्रारीवरून मनोज शर्मा, प्रल्हाद स्वालका, मनोज स्वामी याच्या विरुध्द माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये वसमत शहर पोलिस ठाण्यात सोमवारी ता. २७ पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बालाजी मिरासे, काशीनाथ भोपे पुढील तपास करीत आहेत.
फ्रॉडचा फंडा…
नागरीकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांच्या खात्यावर इतर व्यक्तींना जादा पैशाचे अमिष दाखवून त्यांच्या बँक खात्यातील पैसे वळते करून घ्यायचे व ते पैसे आपल्या बँक खात्यात वळते करीतं फ्रॉड केला जात होता. त्यातून संबंधित व्यक्तीला कमीशन दिले जात होते. विशेष म्हणजे राजस्थानातील तरुण जे बँक खाते वापरत होते त्यावर देशभरात २० गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


