
तब्बल १५ वर्षांपासून लोकार्पणाचे भिजत घोंगडे…
माजी नगरसेवक प्रकाश इंगळे यांची सभागृहाच्या लोकार्पणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव…
वसमत,ता.६
वसमतच्या सांस्कृतिक वैभवात कै सुरमणी प्रा दत्ता चौगूले सांस्कृतिक सभागृहाची भर पडली मात्र सदरील सांस्कृतिक सभागृहत केवळ शासन आणि प्रशासनाचेच कार्यक्रम होत असल्याने त्याला शासकीय कामकाजाचे कार्यालय असल्याचे स्वरुप आले आहे. विशेष म्हणजे कलाप्रेमी नागरीक लोकार्पनाची आतुरतेने वाट पाहत असताना याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. माजी नगरसेवक तथा कलावैभव सांस्कृतिक व क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रकाश इंगळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केल्यानंतर लोकार्पणचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.
वसमत शहरात सुरमणी प्रा दत्ता चौगूले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या नावाने सांस्कृतिक सभागृह उभारावे अशी कलाप्रेमी नागरीक यांची इच्छा होती. तसेच सर्व पक्षीय नगरसेवकांनी यासाठी पुढाकार घेतला. त्यानुसार नगर परिषदेच्या वतीने जुनी नगर परिषद कार्यालयाच्या जागेत २००८ मध्ये सांस्कृतिक सभागृह बांधकामास सुरुवात केली. त्यावेळी तत्कालीन पालकमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या पुढाकारातून राज्य शासनाकडून बांधकामास निधी उपलब्ध करुन दिला होता. तसेच सभागृ बांधकाम करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केले. मात्र राजकीय सत्तानाट्य व प्रशासकीय अडचणींमुळे सभागृहाचे बांधकाम रखडले होते. अंतर्गत तांत्रिक बाबी व काही किरकोळ कामे अपूर्ण राहिल्याने लोकार्पण होऊ शकले नाही. तब्बल दहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतरही अपूर्ण कामे पुर्ण होऊ शकली नसल्याने अखेर २०१८ मध्ये शब्द सह्याद्री प्रतिष्ठान व कलावैभव सांस्कृतिक मंडळाच्या वतीने धूळखात पडलेल्या सभागृहासमोर सुरमणी प्रा दत्ता चौगुले यांचा स्मृतिदिन साजरा केला. तसेच प्रशासनाला निवेदन देऊन लोकार्पण करण्याची विनंती केली.
यापुर्वी शहरात कै नरहर कुरुंदकर सांस्कृतिक सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडायचे. परंतू हे सभागृह ही मोडकळीस येवून १५ वर्षांचा काळ उलटून गेला. लोकार्पणाच्या प्रतिक्षेत एक पिढी विना कार्यक्रमाची संपुष्टात येत आहे. भविष्यातील उदयोन्मुख कलावंतांना दर्जेदार कार्यक्रम बघायला मिळावे अशी माफक इच्छा वसमतकरांची आहे. सद्यस्थितीत सुरमणी प्रा दत्ता चौगुले सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम व अंतर्गत तांत्रिक बाबी पुर्ण झाल्या आहेत परंतू या सार्वजनिक इमारतीचे लोकार्पण न करता केवळ प्रशासकीय कार्यक्रम घेतले जातात. त्यामुळे तात्काळ सुरमणी दत्ता चौगुले सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण करावे नसताना नाईलाजाने उपोषण करावे लागेल असा इशारा प्रकाश इंगळे यांनी जिल्हाधिकारी यांना दिसलेल्या निवेदनात दिला आहे.
