अपघात करून पळून जाणाऱ्या आयशरच्या चालकास मॉर्निंग वॉक करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून पकडले.
——————-
प्रतिनिधी :
——————-
वसमत आसेगाव रोडवर मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या एका वयोवृद्धास भरधाव आयशरने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवार ता.४ सकाळी पावणे सहाच्या सुमारास घडली. अपघातानंतर वाहनासह पळून जाणाऱ्या चालकास मॉर्निंग वॉकसिटी बाहेर पडलेल्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून वाहन व चालकास ताब्यात घेतले आहे. याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसमत शहरातील व रोड परीसरातील नागरीक मॉर्निंग वॉक साठी सकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत वसमत आसेगाव रोडवर मोठ्या प्रमाणात असतात. बुधवारी आसेगाव रोडवर असलेल्या इंजनगाव पश्चिम येथील ज्येष्ठ नागरिक रेशमाजी पिराजी मईन वय ७५ वर्ष हे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडले होते. ते आसेगावच्या दिशेने विसावा धाब्याजवळ गेले असता वसमत कडून येणाऱ्या भरधाव आयशरने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात रेशमाजी मईन यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने वाहन न थांबवता पळून जात होता. दरम्यान याच वेळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस जमादार विजय उपरे व त्यांचे मित्र मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेले असतानाच त्यांनी हा प्रकार पाहिला. तसेच रोड ने जाणाऱ्या प्रवाशाची दुचाकी थांबून आयशरचा पाठलाग करुन वाहन व चालक दत्ता पटवे यास ताब्यात घेतले. याबाबत संदिप रेशमाजी मईन यांच्या फिर्यादीवरून संबंधित चालकाविरुद्ध वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एकनाथ डक हे करीत आहेत.
सकाळच्या प्रहारी भरधाव अवैध वाहतुकीचा नागरिकांना धोका
वसमत आसगाव मार्गे नांदेड रस्ता चांगला झाल्याने व कमी वेळेत वसमत येथूध नांदेडला किंवा नांदेडहून वसमतला पोहोचत असल्याने अनेक अवैध व्यवसायिकांनी या रस्त्याची पळवाट म्हणून निवड केली आहे. यात प्रामुख्याने नांदेड येथून होणारी अवैध वाळू वाहतुकीचे वाहने भीतीपोटी भरधाव वेगाने जात असतात. दरम्यान याच रस्त्यावर शहरातील नागरिकांची मॉर्निंग वॉक असते. तसेच अनेक तरुण-तरुणी पोलीस भरती सह विविध भरतीसाठी सराव करीत असतात. त्यांना या अवैध भारधाव वाहतुकीचा धोका निर्माण झाला आहे.


