
वसमतला शिवसेना (शिंदे गट) जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन ; आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीसाठी स्वबळाचे संकेत..
——————–
प्रतिनिधी :
——————–
मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. कधी जात,पात,धर्म न पाहता प्रत्येकाचं काम करतो. स्व बाळासाहेब ठाकरे यांनी अन्यायाविरुद्ध उभं राहून शिवसैनिकांनी लढलं पाहिजे अशी शिकवण दिली आहे. म्हणून मी चांगल्यासाठी चांगलाच आहे परंतू कोणी आई-बहिनीची छेड काढत असेल तर त्यांच्यासाठी आम्ही शंभर टक्के गुंडच असल्याचे आमदार संतोष बांगर म्हणाले. रविवार ता.१२ डॉ मारोती क्यातमवार व सौ सविता क्यातमवार यांनी आयोजित केलेल्या वसमत शहर जनसंपर्क कार्यालयाचे तसेच नेत्ररोग शिबिराचे उद्घाटन आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
या वेळी व्यासपिठावर ज्येष्ठ नेते माजीमंत्री डॉ जयप्रकाश मुंदडा, माजी सभापती संजय बोंढारे, युवासेना जिल्हाप्रमुख राम कदम, महिला जिल्हाप्रमुख रेखा ताई देवकते, डॉ मारोती क्यातमवार, सौ सविता क्यातमवार, उपजिल्हाप्रमुख रामकिशन झुंझूर्डे, तालुकाप्रमुख राजू चापके, विधानसभा प्रभारी मच्छिंद्र सोळंके, युवासेना उपजिल्हा प्रभारी बाबा आफुने, शहर प्रमुख प्रभाकर क्षीरसागर, विधानसभा प्रमुख विजेंद्र क्षीरसागर, विशाल ढोरे, विनायक सातपुते, मनोज चव्हाण, राजेश पवार, पुरुषोत्तम इपकलवार यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार बांगर मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, वसमत शहराला शिवसेनेची परंपरा आहे. डॉ मारोती क्यातमवार यांच्या रुपाने वसमतला चांगले नेतृत्व मिळाले आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुक लढवायची आहे. त्यासाठी वेळप्रसंगी कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी स्वबळाचा विचार करु असे बोलून त्यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचे संकेत दिले. तुम्ही तुमच्या पातळीवर निर्णय घ्या मी जिल्हाप्रमुख या नात्याने तुमच्या खांद्याला खांदा लावून मैदानात उतरतो असा विश्वास त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.
तात्पुरवी सत्कार सोहळ्यानंतर प्रास्ताविकात डॉ मारोती क्यातमवार यांनी थेट नगरपालिका निवडणुकीच्या विषयांत हात घातला. वसमतला शिवसेनेची मोठी परंपरा असून यावेळीही नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणार असल्याचे म्हणाले. नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढविण्याची संधी मिळाल्यास त्याचे सोने करेल असे अभिवचन दिले. यानंतर तालुकाप्रमुख राजू चापके यांनी आगामी निवडणुकांसाठी इच्छूकांची संख्या वाढल्याने कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी निवडणूका स्वबळावर लढवाव्या अशी विनंती केली. शेवटी माजीमंत्री डॉ जयप्रकाश मुंदडा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी शहर व परीसरातील शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी डॉ शितल क्यातमवार यांनी शिबिरार्थी रुग्णांच्या नेत्र तपासणी करुन उपचार केले.
