
वसमत / साईनाथ पतंगे/निखिल चव्हाण यांजकडून….
शहरातील नागरीकांची वर्दळ असलेल्या कौठा रोडवरील मदिना चौकात सनवट मातीने भरलेल्या भरधाव हायवा डंपरने रस्त्याच्या बाजूला उभे असलेल्या नागरीकांना धडकून उभ्या अँटोवर पलटी झाला. या अपघातात एक महिला व एक मुलगा चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन मुलं गंभीर जखमी झाले आहेत. अँटोचालक मात्र या अपघातातून बचावला आहे. जखमींना प्राथमिक उपचारानंतर नांदेड येथे हलविण्यात आले आहे. हि दुर्दैवी घटना शनिवारी ता.३ दुपारी एक च्या सुमारास घडली आहे.
शहराला लागुन असलेल्या कौठा रोडवर विट भट्टी कारखाने आहेत. सदरील कारखान्यासाठी सनवट माती पुरविण्यासाठी हायवा डंपर रात्रंदिवस वर्दळ सुरु असते. शनिवारी दुपारी एक च्या सुमारास भरधाव वेगाने निघालेला सनवट मातीने भरलेला हायवा डंपर कौठा रोडवरील नागरीकांची वर्दळ असलेल्या मदिना चौकात आला असता समोर डाव्या बाजूला अँटो व ट्रँक्टर वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यानंतर सदरील हायवा उजव्या बाजूला सावलीत पाणी पिण्यासाठी उभे असलेल्या यास्मीन मोईनखान वय २७ वर्ष राहणार मनमाड, भाऊ शोयबखान वय १४ वर्ष कुरुंदा तालुका वसमत, दोन मुलं आजाद मोईनखान वय ७ वर्ष व आफान मोईनखान वय ५ वर्ष दोघे राहणार मनमाड यांना धडकून उभ्या अँटोवर पलटी झाला. या भीषण अपघातात यास्मिन मोईनखान व शोएब खान यांचा चिरडल्याने जागीच मृत्यू झाला तर आजादखान व आफानखान हे गंभीर जखमी झाले आहेत. अँटो चालक संतोष खनके राहणार हयातनगर तालुका वसमत हे मात्र या अपघातामधून बचावले आहेत. सदरील मयत महिला दोन मुलांसह नातेवाईकांच्या लग्नासाठी आले होते अशी माहिती आहे. वर्दळ असलेल्या ठिकाणी ही घटना घडली असल्याने तेथील व्यापारी, नागरीक, सामाजिक कार्यकर्ते यांनी तात्काळ मदत सुरु केली. शहर पोलीस , ग्रामीण पोलिस व अधिकारी यांनी धाव घेऊन घटनास्थळ गाठले. तब्बल दोन तासाच्या प्रयत्नानंतर दोन क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त हायवा डंपर बाजूला करण्यात यश आले. सुदैवाने डंपरखाली कोणीतीही जिवितहानी झाली नाही.
आमदार राजु नवघरे मदतीला धावले….
घटनेची माहिती कळताच आमदार राजु नवघरे यांनी घटनास्थळी भेट दिली. या वेळी त्यांनी पोलिस, आरोग्य प्रशासनास तात्काळ मदतीच्या सुचना केल्या.
प्रादेशिक परिवहन विभाग व महसुलचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर….
वसमत शहरात व परीसरात क्षमतेपेक्षा जास्त अनाधिकृत गौण खनिजाची वाहतुक सुरु आहे. याकडे प्रशासनाकडून रितसर काणाडोळा केला जातो. तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी केवळ शहराला “व्हिजीट” देऊन जातात मात्र भरदिवसा होणारी अवैध वाहतूक तपासल्या जात नाही आणि कारवाई केली जात नाही. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नाहक बळी गेल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.
