वन विभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात स्पष्ट, बिबट्या पिंजऱ्यात गेलाच नाही, ग्रामस्था, शेतकरी भयभीत…
——————
प्रतिनिधी :
—————–
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात असलेल्या पाेतरा शिवारात दोन शेळ्या, एका वासराची शिकार केलेल्या बिबट्याचा चौथ्या दिवशी सुध्दा याच भागात वावर दिसून आला यावेळी त्याने एका कुत्र्याची शिकार केल्याचे सोमवारी ता. १५ दिसून आले. वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये दोन बिबटे आल्याचे दिसून आले मात्र ते पिंजऱ्यात गेलेच नाहीत. आता त्यांना पिंजऱ्यात जेरबंद करण्यासाठी वन विभागाने आणखी दोन शेळ्या पिंजऱ्यात बांधून ठेवण्याची तयारी चालवली असल्याचे वन विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
कळमनुरी तालुक्यातील पोतरा व तेलंगवाडी शिवारात मागील चार-पाच दिवसापासून बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. तेलंगवाडी शिवारात काशीराम मोदे यांच्या शेतातील दोन शेळ्यांचा फडशा पाडल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी ता. १३ बिबट्याने पोतरा शिवारातील गजानन पतंगे यांच्या शेतातील वासराची शिकार केली. त्यानंतर रविवारी ता. १४ एका कुत्र्याची शिकार केल्याचे दिसून आल्याचे वन विभागाच्या सुत्रांनी सांगितले.
विभागीय वन अधिकारी राजेंद्र नाळे, सहाय्यक विभागीय वन अधिकारी सचिन माने, वन परिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार, वनपाल शिवाजी काळे, वनरक्षक सुधाकर कऱ्हाळे, खंडागळे, योगीता सहारे यांच्या पथकाने शेतकऱ्यांच्या मदतीने रविवारी ता. १४ पोतरा शिवारातील टेकड्यावर तीन पिंजरे बसविले आहेत. त्याच परिसरात सुमारे १५ ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
दरम्यान, या ठिकाणी दोन बिबटे आले असल्याचे ट्रॅप कॅमेऱ्यातून स्पष्ट झाले. दोन्ही बिबटे पिंजऱ्याच्या जवळ आले होते मात्र ते पिंजऱ्यात गेलेच नाहीत. त्यानंतर आता तीनही पिंजऱ्यामध्ये आणखी एक शेळी वाढविली जाणार असल्याचे वन विभागाच्या सुत्रांनी सांगितले. दरम्यान, परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थ शेतकरी भयभीत झाले आहेत.


