
खुदनापुर शिवारातील आखाड्यावरुन. २० कट्टे हळद केली होती लंपास…
**********
वसमत
**********
वसमत तालुक्यातील खुदनापुर शिवारातील आखाड्यावरुन २० कट्टे हळदीची चोरी झाल्याची घटना १८ एप्रिल २०२५ रोजी घडली होती. याबाबत वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासानंतर सदरील चोरट्यास ग्रामीण पोलीस पथकाने नांदेड जिल्ह्यातील लोंढे सांगवी येथून ताब्यात घेतले आहे.
याबाबत ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कवठा पाटीजवळील खुदनापुर शिवारातील आखाड्यावरुन हळदीचे २० कट्टे चोरट्यांनी लंपास केल्यानंतर सदर गुन्ह्याचा तपास लावण्याबाबत पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी ठाणेदार सहायक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे यांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार गजानन बोराटे यांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनिय माहितीचा अभ्यास केल्यानंतर सदर चोरी ही नांदेड जिल्ह्यातील लोंढे सांगवी येथील सुरज लक्ष्मण बोगरे वय २० याने त्याच्या साथीदारांसह केल्याचे तपासात निष्पन्न झाले. ग्रामीण पोलीस पथकाने आरोपी सुरज डोंगरे यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडून चोरी मधील मुद्देमाल विकून त्याच्या वाट्याला आलेले २५ हजार रुपये पोलिसांना दिले. पथकात सहायक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे पोलिस उपनिरीक्षक संतोष मुपडे, पोलीस अंमलदार अविनाश राठोड. विजय उपरे, अजय पंडीत, जयकुमार वराडे, नामदेव बेंगाळ, सायबरचे प्रदिप झुंगरे मारोती काकडे यांचा समावेश होता.
