
वसमत परभणी रोडवरील रेल्वे दादरा पुलाजवळ आढळला मृतदेह
- ————–
वसमत
————–
सोमवारी ता.१९ रात्री ८ च्या सुमारास वसमत- परभणी रोडवरील रेल्वे दादरा पुलाजवळ एका तरुणाचा मृतदेह आढळला. सदरील तरुण हा हयातनगर तालुका वसमत येथील असून त्याची डोक्यात वार करुन हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत मंगळवारी ता.२० सकाळी शहर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाचा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत परभणी रोडवरील रेल्वे दादरा पुलाजवळ चांदू सुग्रीव जाधव वय ३४ राहणार हयातनगर तालुका वसमत हा गंभीर जखमी अवस्थेत पडलेला असल्याची माहिती शहर पोलिसांना सोमवारी मिळाली होती. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सुधिर वाघ व पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले. सदरील युवकाच्या डोक्यात जबर मार असल्याने तो गंभीर जखमी होता. त्यास तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. खुनाचे कारण मात्र समजू शकले नाही. याबाबत मयताच्या भाऊ राम जाधव यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रामा येरडकर वय ३२ , अनिल गुंजाळे वय ३४ दोघे राहणार पुर्णा सहकारी साखर कारखाना वसमत व ओम माने वय २८ राहणार हयातनगर या तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधिर वाघ हे करीत आहेत.
