
सीईओंच्या इशार्यानंतर ६५५ पैकी ४२४ गावांनी केली निकषाची पुर्तता
—————-
वसमत :
—————-
हिंगोली जिल्हयात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ओडीएफ प्लस मॉडेल गावांची प्रगती कमी असल्याचे दिसताच मुख्यकार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी तालुकास्तरीय यंत्रणेला कारवाईचा इशारा देताच या गावांमधून प्रगतीला वेग आला असून सध्याच्या स्थितीत ६५५ पैकी ४२४ गावे ओडीएफ प्लस मॉडेल झाली आहेत. पुढील काही दिवसांतच संपूर्ण गावे ओडीएफ प्लस माॅडेल करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
हिंगोली जिल्ह्यात ६५५ गावांमधून ओडीएफ प्लस मॉडेल गावे करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यानुसार स्वच्छ भारत मिशन अंतर्गत तालुकास्तरीय यंत्रणांच्या बैठकीत वेळोवेळी सुचना दिल्यानंतरही त्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नव्हती. त्यामुळे हिंगोली जिल्हयाची प्रगती असमाधानकारक असल्याने वरिष्ठ कार्यालयाकडून नाराजीचा सूर व्यक्त केली जाऊ लागला होता.
दरम्यान, मुख्यकार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी हिंगोलीचा पदभार स्विकारताच आरोग्य, स्वच्छभारत मिशन, शिक्षण या विभागांसोबतच इतर विभागांच्या योजनांकडे लक्ष देऊन त्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तर स्वच्छ भारत मिशनचे काम असमाधानकारक असल्यामुळे त्यांनी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय यंत्रणेची तातडीची बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी तालुकानिहाय आढावा घेतला होता. यामध्ये ओडीएफ प्लस मॉडेल गावे का होत नाहीत असा सवाल उपस्थित केला. कुठल्याही परिस्थितीत गावांमधून ओडीएफ प्लस मॉडेल गावाचे निकष पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. या कामात कुचराई करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा त्यांनी दिला होता.
दरम्यान, मुख्यकार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी कारवाईचा इशारा देताच स्वच्छ भारत मिशनच्या प्रगतीला वेग आला आहे. यातून ६५५ पैकी ४२४ गावे ओडीएफ प्लस मॉडेल गावे झाली आहेत. यामध्ये औंढा तालुक्यातील ८६, वसमत ८८, हिंगोली ६६, कळमनुरी ९५ तर सेनगाव तालुक्यातील ८९ गावांचा समावेश आहे.
जिल्हयातील उर्वरीत गावे ओडीएफ प्लस मॉडेल करण्यासाठी उपमुख्यकार्यकारी अधिकारी संजय कुलकर्णी, कर्मचारी भास्कर देशमुख, महेश थोरकर, रघुनाथ कोरडे, विशोर पडोळे, मस्के, गंगासागर यांनी तालुकास्तरावर आढावा घेण्यास सुरवात केली आहे.
ओडीएफ प्लस मॉडेल गावांनी पूर्ण केले निकष
ओडीएफ प्लस मॉडेल गावांमधून सामुदायीक शोषखड्डे, भुमीगत गटार व्यवस्था, कंपोस्ट खड्डे, कचार संकलन व वाहतुक, कचरा विलगीकरण करणे तसेच कचरा संकलन व विलगीकरण शेड उभारणी हे निकष पूर्ण केल आहेत.
