पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल, तीन जण ताब्यात…
——————-
प्रतिनिधी :
——————–
हिंगोली तालुक्यातील भांडेगाव येथे जून्या् वादातून झालेल्या गोळीबारात दोन जण ठार तर दोघे जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी ता. २३ रात्री घडली आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकारी दाखल झाले असून प्रकरमात तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमुळे जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे.
हिंगोली तालुक्यातील भांडेगाव येथील कुंडलीक जगताप व बाबाराव जगताप यांच्यामध्ये शेतीचा जूना वाद होता. या वादातून त्यांच्यात नेहमीच कुरबुरी होत होत्या. मंगळवारी ता. २३ रात्री आकरा वाजण्याच्या सुमारास कुंडलीक हे त्यांचा मुलगा शिवराज जगताप (२९), सुभाष कुरवाडे, बालाजी जगताप यांना सोबत घेऊन बाबाराव जगताप यांच्या घरी गेले होते. यावेळी घराचा दरवाजा वाजविताच बाबाराव याने दरवाजा उघडताच बंदुकीतून गोळ्या झाडण्यास सुरवात केली. यामध्ये तीन कुंडलीक यांना तीन गोळ्या लागल्या तर त्यांचा मुलगा शिवराज यांच्या छातीवर गोळी लागली यामध्ये दोघांचा मृत्यू झाला.
या शिवाय त्यांच्यासोबत असलेल्या सुभाष कुरवाडे, बालाजी जगताप यांनाही गोळ्या लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले, हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक शामकुमार डोंगरे, उपनिरीक्षक राहुल घुले, जमादार आकाश पंडीतकर, रमेश जाधव, शंकर इडोळे, सुधीर ढेंबरे, प्रदीप राठोड, शेख रहिम यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तर पोलिस निरीक्षक संदीप मोदे, जमादार अशोक धामणे, अनिल डुकरे, संतोष करे, शेख मुजीब यांच्या पथकाने शासकिय रुग्णालय गाठले.
गावात रात्रभर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. तुर्तास या प्रकरणात बाबाराव जगताप , विठ्ठल जगताप, ज्ञानेश्वर जगताप यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
