
अधिष्ठाता चक्रधर मुंगल व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नितिन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई…
——————-
प्रतिनिधी :
——————-
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या आदेशानुसार अधिष्ठाता श्रीचक्रधर मुंगल व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप मोदे यांच्या सहकार्याने जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष व जिल्हा पोलीस यांनी हिंगोली शहरातील शाळांच्या चारही बाजूने 100 मीटरच्या परिसरातील 10 पानटपऱ्यावर बुधवार ता.8 धडक कार्यवाही करुन त्यांच्याकडून 2700 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शाळेच्या आवारातील पान टपऱ्यांवर कार्यवाही करण्याबाबत आदेश जारी केले होते. त्या अनुषंगाने ही कार्यवाही करण्यात आली. जिल्हाभरात कार्यवाहीची ही मोहीम चालूच राहणार आहे.
ही कार्यवाही जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाचे जिल्हा सल्लागार डॉ. किरण लोंढे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. यावेळी सोशल वर्कर आनंद साळवे, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे व्यवस्थापक मंगेश गायकवाड, पोलीस नाईक शंकर ठोंबरे, गणेश वाबळे आदींचे सहकार्य लाभले.
कोटपा कायदा- 2003 च्या कलम -4 अन्वये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान बंदी, कलम -5 अन्वये प्रत्यक्ष – तंबाखूयुक्त कोणत्याही पदार्थाच्या अप्रत्यक्ष जाहिरातीस बंदी, कलम -6 अ अन्वये 18 वर्षाखालील मुलांना तंबाखूयुक्त पदार्थ विक्री करणे किंवा त्यांच्याकडून विक्री करून घेणे कायद्याने गुन्हा आहे. कलम 6 ब अन्वये शैक्षणिक संस्थांच्या चारही बाजूने 100 मीटरच्या परिसरात तंबाखूयुक्त पदार्थ विक्री करण्यास बंदी आहे. कलम 7, 8, 9 अन्वये तंबाखूच्या पॅकेटच्या 85 टक्के भागावर चित्रात्मक व लिखित वैधानिक इशारा स्पष्टपणे रेखांकित असणे आवश्यक आहे.
