हिंगोली जिल्हा स्थानिक गुन्हा शाखेची कार्यवाही…
——————-
हिंगोली : साईनाथ पतंगे
——————
हिंगोली जिल्ह्यातील घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांचा स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी उलगडा करत एकूण ४ गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत तब्बल १० लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. नीलभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्ध गुन्ह्यांवर प्रतिबंध करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली व विविध पोलीस ठाण्यांच्या पथकांनी समन्वयाने तपास सुरू केला होता.
दि. १ एप्रिल रोजी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपींनी विविध ठिकाणी घरफोडी व चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी पुढील तपास करत संबंधित गुन्ह्यांचा उलगडा केला.
या कारवाईत आरोपींकडून चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम तसेच इतर मौल्यवान साहित्य असा एकूण १०,७०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहनही पोलिसांनी हस्तगत केले आहे.
या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. जिल्ह्यातील वाढत्या चोरी व घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांची ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसलें तसेच त्यांच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी ही कामगिरी पार पाडली.
पोलिसांच्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, पुढील काळातही अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


