एक लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याची तक्रार, कारवाईची मागणी
*********
वसमत :
**********
हिंगोली येथील महा आयटी केंद्राच्या जिल्हा समन्वयकाने आधार नोंदणी केंद्र मिळवून देण्याच्या बहाण्याने एक लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार एका नागरिकांनी केली आहे. याप्रकरणी संबंधित समन्वयकावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यासंदर्भात वाईच्या पिंपरी येथील बालाजी कोंघे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासह पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली आहे. यामध्ये महा आयटी चे जिल्हा समन्वयक सागर भुतडा यांनी आधार नोंदणी केंद्र मिळवून देण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली. त्यानुसार तारीख 4 फेब्रुवारी रोजी इमरान शेख नावाच्या व्यक्तीच्या फोनपेवर पन्नास हजार रुपये पाठवले होते त्यानंतर 5 फेब्रुवारी रोजी सागर भुतडा यांच्या फोनपेवर वीस हजार रुपये पाठवले व पंधरा हजार रुपये रोख दिले. त्यांनी 85 हजार रुपयांची रक्कम घेतल्यानंतर एक कीट उपलब्ध करून दिले त्यासाठी पंधरा हजार रुपये देखील घेतल्याचे नमूद केले आहे.
मात्र काही दिवसातच आधार नोंदणी किट परत औंढा येथील महिला बालकल्याण विभागाला देण्याची सूचना केली. याबाबत अधिक चौकशी केल्यानंतर सागर भुतडा यांनी दिलेला आधार किट त्याच्या मालकीचा नसून महिला बालकल्याण विभागाच्या मालकीचा आहे यासाठी कुठल्याही प्रकारची रक्कम भरावी लागत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
या प्रकारामुळे आपली फसवणूक झाली असून शासनामार्फत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी बालाजी कोंघे यांनी केली आहे. या प्रकारात आता जिल्हा प्रशासनाने वरिष्ठ पातळीवरून चौकशी सुरू केली आहे.
यासंदर्भात महाआयटीचे जिल्हा समन्वयक सागर भुतडा यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क झाला नाही त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
